नवीन नांदेड (प्रतिनिधी)- काळेश्वर मंदिरातील सायंकाळची आरती करून घरी परतणाऱ्या युवकावर चार जणांनी कट रचून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला असून, जीवघेणा हल्ल्याचे प्रकरण आता खुनात रूपांतरित झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अर्जुन तातेराव हंबर्डे (वय 31) हे काल रात्री सुमारे 8.30 वाजता दररोज प्रमाणे काळेश्वर मंदिरात सायंकाळच्या आरतीसाठी गेले होते. आरती आटोपल्यानंतर ते घरी परतत असताना मंदिराजवळील एका चौकात चार जणांनी त्यांना घेरले. यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्जुन हंबर्डे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी प्रवीण हंबर्डे, शेख आरिफ, चैतन्य पांचाळ आणि सुरज तगडे या चार जणांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. एफआयआरमधील सर्व तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
मृत अर्जुन तातेराव हंबर्डे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे, आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
