नांदेड (प्रतिनिधी)- मुख्याध्यापकाने आपल्याच विद्यालयातील लिपिकाकडून लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१) यांना ५०,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.
नेमकी घटना काय? या प्रकरणातील ३८ वर्षीय तक्रारदार हे हुतात्मा माधव विद्यालय, मुखेड येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. आरोपी मुख्याध्यापक पडलवार यांनी तक्रारदाराकडे विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाखाली माहे जानेवारी २०२६ ते मे २०२६ या पाच महिन्यांचे दरमहा १२,००० रुपये याप्रमाणे हप्त्याची मागणी केली होती. तसेच, तक्रारदाराची बदली करून देण्यासाठी आणि त्यांना कोणतीही नोटीस न देण्यासाठी एकूण ६०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
एसीबीचा सापळा आणि कारवाई: तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार नोंदवली. ३ जून २०२६ रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली, ज्यामध्ये आरोपीने ६०,००० रुपयांऐवजी तडजोडीअंती ५०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पडलवार यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन नांदेडमधील शारदा नगर येथील राहत्या घरी बोलावले होते.
बुधवारी (३ जून) संध्याकाळी, शासकीय पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला असता, मुख्याध्यापक पडलवार यांनी ५०,००० रुपयांची लाच स्वीकारली. याच वेळी पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
जप्त केलेला मुद्देमाल आणि पुढील कारवाई: आरोपीच्या अंगझडतीमध्ये एक विवो कंपनीचा मोबाईल, सोन्याची अंगठी, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि नगदी ५,५०० रुपये मिळून आले आहेत. सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया पूर्ण असून, नांदेडमधील विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर, पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या पथकाने केली आहे.
