विशाल भंडारीचा एक वर्षासाठी पत्ता हर्सूल जेल,छत्रपती संभाजी नगर 

नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड शहर आणि जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतत कठोर पावले उचलत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या आरोपींना स्थानबद्ध करून त्यांची दादागिरी मोडून काढण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा विशाल राजू कानोजी उर्फ भंडारी याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. परिमल नगर परिसरातील हा आरोपी विविध गंभीर स्वरूपाच्या तब्बल ११ गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. परिसरात दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या या गुन्हेगार विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर विशाल उर्फ भंडारी याला एका वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील हरसूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. भाग्यनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कडेकोट बंदोबस्तात कारागृहात रवाना केले. जानेवारी २०२६  पासून आजपर्यंत नांदेड जिल्हा पोलिसांनी अशा १० सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध केले असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत ४३ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. गुन्हेगारांनी कितीही दादागिरी केली तरी पोलिसांचा हात आता त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचला असून, नांदेडमध्ये गुन्हेगारीला कोणतीही माफी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!