किनवट (प्रतिनिधी)- कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार किनवट तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास पाटोदा (ता. किनवट) येथे आरोपी तारासिंग रा.मामडा ( निर्मल), यल्ल्या वडे (रा. इकबालपूर मंडळ, जि. निर्मल), संदीप व इतर चार ते पाच जणांनी संगनमत करून फिर्यादीला कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडलेल्या फिर्यादीकडून आरोपींनी ३ लाख १५ हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर सोने न देता त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी पद्मावती नगर, खानापूर मंडळ (जि. निर्मल) येथील यल्ला रविंद्र रेड्डी भुमा रेड्डी (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ६१, ३०८(२) तसेच बीएनएसएस-२०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक फडेवार करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे
