मुबई (प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशकं पूर्ण झाली. संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशभरात भाषणं केली जातात, जयंत्या साजऱ्या केल्या जातात, समानतेच्या घोषणा दिल्या जातात. पण माष्टी, ता. धर्माबाद, जि. नांदेड या छोट्याशा गावाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की कागदावर भारत आधुनिक झाला असला तरी काहींच्या डोक्यातील जात अजूनही मध्ययुगातच अडकून पडली आहे.महार आहात ना? मग डोकं वर कसं काढलंत?हा प्रश्न शब्दांनी नाही तर विटा, लाकडं, मिरचीपूड आणि सामूहिक हिंसेने विचारला गेला. ही घटना आहे सुनिल पिराजी सोनकांबळे (वय २३), बी.ए. तृतीय वर्ष विद्यार्थी, रा. माष्टी यांची. शिक्षण घेणारा, आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण. पण त्याचा सर्वात मोठा “गुन्हा” कोणता? तो महार समाजाचा आहे. लग्नघरातील आनंदातून जातीय हिंसेकडे १० मे २०२६ रोजी चुलत भाऊ गणेश चांदराव सोनकांबळे यांचे लग्न असल्याने घरात उत्साहाचे वातावरण होते. लग्नासाठी शिदोरी तयार करण्यासाठी सुनिलची बहिण मिराबाई प्रकाश भालेराव आणि काकू शांताबाई माधवराव सोनकांबळे या सायंकाळी ४ वाजता गणेश सोनकांबळे यांच्या घरी गेल्या. संध्याकाळी साधारण ६ वाजता त्या घरी परतत असताना गावातीलच भक्ती बालाजी कदम आणि श्रीदेवी हाणमंत कदम यांनी अचानक शिवीगाळ सुरू केली. कारण? काहीच नाही. फक्त समोरून महार महिला जात होत्या. मिराबाई आणि शांताबाई यांनी विचारलं आम्हाला का शिव्या देता? यावर उत्तर मिळाल छिन्नाल रांडा…इतक्यावरही राग शांत झाला नाही. भक्ती बालाजी कदम, श्रीदेवी हाणमंत कदम आणि बालाजी लक्ष्मण कदम घराबाहेर येऊन थेट मारहाण करू लागले. मोबाईलने सत्य टिपण्याचा प्रयत्न आणि हिंसेचा स्फोट घरातील आवाज ऐकून सुनिल सोनकांबळे बाहेर आला. तो मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करू लागला. कारण अनुभव सांगतो दलितांवर अत्याचार झाला की पुरावा नसतो, आणि पुरावा नसला की न्यायही नसतो. पण इथे तर न्यायाचा मोबाईलच हिसकावून घेतला गेला. बालाजी लक्ष्मण कदम यांनी सुनिलचा फोन खेचून घेतला. त्यानंतर तिघांनी मिळून सुनिल, त्याची बहिण आणि काकू यांना विटा व लाकडांनी बेदम मारहाण केली.गावातील लोक जमा झाले. भांडण सोडवण्यासाठी गोविंद नागोराव कांबळे, विठ्ठल गंगाराम कांबळे, मालनबाई दिंगाबर कांबळे, अर्चना संदीप कांबळे, चंदाबाई उजलाजी सोनकांबळे, प्रिया मधुकर कांबळे, चांदु लक्ष्मण सोनकांबळे, सावित्राबाई चांदुराव सोनकांबळे, आम्रपाली गंगाराम कांबळे, नागोराव गंगाराम कांबळे, सुलनबाई मनोहर कांबळे, तुळसाबाई निवृत्ती सोनकांबळे, निवृत्ती चोखोबा सोनकांबळे, संगीता सोनबा सोनकांबळे आदी नातेवाईक आले.पण गावातील जातीय अहंकाराला एवढ्यावर समाधान नव्हतं. म्हारड्यांनो लय माजलात का?” — सामूहिक हल्ला क्षणातच मोठा जमाव तयार झाला. त्यात खालील आरोपी सहभागी झाले: भक्ती बालाजी कदम श्रीदेवी हाणमंत कदम बालाजी लक्ष्मण कदम श्रीराम बापुराव जाधव दत्ताहरी रावसाहेब कदम देवदत्त मोहन कदम अनुसयाबाई शिवाजी कदम आनंत शिवाजी जोगदंड गजानन लोकडोबा जाधव योगेश बळीराम कदम अवधुत रावसाहेब कदम शिवाजी सोपान कदम रावसाहेब रामजी कदम शंकर मारोती कदम राधा हनुमंत कदम सुधीर हाणमंत कदम तसेच व्हिडिओमध्ये दिसणारे इतर लोक. या सर्वांनी मिळून सुनिल व त्याच्या कुटुंबावर विटा, लाकडं आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. जातिवाचक शिवीगाळ करत म्हारड्यांनो लय माजलात का? असे ओरडत मारहाण सुरू होती. एका महिलेला मिराबाई भालेराव यांची साडी ओढण्यात आली. लहान मुलगी प्रिया मधुकर कांबळे हिलाही मारहाण करून जखमी करण्यात आले. कार्तीक भालेराव व साईदीप भालेराव या मुलांनाही सोडले नाही.जणू काही गावाने ठरवलं होतं आज संविधानाला सार्वजनिकरित्या मारायचं. घर उद्ध्वस्त, अंगणात ओढून मिरचीपूड हल्लेखोरांनी घराचे दरवाजे लाथा मारून तोडले. कुटुंबीयांना रस्त्यावरून ओढत घराच्या अंगणात आणले. त्यांच्यावर मिरचीची भुकटी टाकण्यात आली डोळे जळावेत, आवाज थांबावा, आणि प्रतिकार संपावा म्हणून. कारण त्यांना एकच अपराध होता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली होती. होय, आरोप असा होता गावात आंबेडकर जयंती साजरी करता का? म्हणजे संविधानाचे शिल्पकार आठवले तर शिक्षा ठरलेली.खरे तर या गावात पहिल्यांदाच डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली होती. त्याची रीतसर की,कायदेशीर सरकारची परवांनगी सुद्धा घेण्यात आली होती. पोलिस आल्यावर शौर्य गायब कुंडलवाडी पोलीस गावात दाखल होताच, ज्यांनी काही मिनिटांपूर्वी शेकडो लोकांसमोर दहशत माजवली होती तेच लोक क्षणार्धात पळून गेले. हिंसेचा सारा पराक्रम पोलिसांच्या सायरनसमोर विरघळला. मारहाणीनंतरही संपला नाही अत्याचार घटना इथे संपत नाही. खरा सामाजिक बहिष्कार त्यानंतर सुरू झाला. गावात महार कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले. फिल्टरचे पाणी मिळत नाही. ऑटोमध्ये बसू देत नाहीत. काम देत नाहीत. गिरणीत दळण घेतले जात नाही. समाजिक संबंध तोडले गेले. ही शिक्षा कोर्टाने दिलेली नाही. ही शिक्षा जात नावाच्या अनधिकृत न्यायालयाने दिली आहे. स्वातंत्र्य, संविधान आणि गावातील वास्तव भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे झाली. संसदेत समानतेच्या घोषणा केल्या जातात. सोशल मीडियावर जात संपली अशी भाषणं केली जातात. पण माष्टी गाव सांगतं जात संपली नाही, ती फक्त सभ्य शब्दांच्या मागे लपली आहे.एकीकडे भारत चंद्रावर पोहोचल्याचा अभिमान मिरवतो, आणि दुसरीकडे एका समाजाला अजूनही पाणी, काम, सन्मान नाकारला जातो. ही घटना फक्त मारहाणीची नाही; ही भारतीय संविधानाच्या कलम १४, १५, १७ आणि २१ यांच्यावर सामूहिक हल्ला आहे. प्रश्न समाजालाच जर आजही महार म्हणून एखाद्याला मारलं जात असेल, जर महिलांची साडी ओढून अपमान केला जात असेल, जर मुलांवरही जात पाहून हल्ला होत असेल, तर आपण खरोखर आधुनिक भारतात जगतोय का? की आपण अजूनही त्या काळात आहोत जिथे जन्मच गुन्हा मानला जातो? उपरोधिक सत्य देशात मोठमोठे कार्यक्रम होतात सबका साथ, सबका विकास. पण गावात अजूनही घोषणा अशीच आहे सबका साथ, पण महार वेगळे.शाळांमध्ये संविधान शिकवलं जातं, आणि बाहेर पडताच समाज त्याची राख करतो.राजकारणात आंबेडकरांचे फोटो लावले जातात, पण त्यांच्या विचारांना गावाच्या सीमेबाहेर प्रवेश नाही. पुढे काय? सुनिल सोनकांबळे यांनी कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून वरील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई होईल का? की काही दिवसांनी समेट नावाची सामाजिक दबावाची स्क्रिप्ट सुरू होईल? इतिहास सांगतो दलितांवर अत्याचार झाला की समाज विसरतो, पण जखमा विसरत नाहीत. शेवटचा प्रश्न भारत २१व्या शतकात पुढे चाललाय असं म्हणतात. पण जर एखाद्या गावात अजूनही लोकांना महार म्हणून मारलं जात असेल, तर प्रश्न देशाच्या प्रगतीचा नाही प्रश्न आपल्या मानवतेचा आहे.कारण सत्य इतकंच आहे: स्वातंत्र्य भारताला मिळालं, पण समानता अजून गावापर्यंत पोहोचलेली नाही. म्हणूनच विद्रोही साहित्यिक आणि कवी नामदेव ढसाळ यांनी आपल्या शब्दात मांडलेली जात आणि व्यवथा अशी आहे .. स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे? मला प्रश्न पडतो या देशातल्या माणसाला अजून किती वेळा जातीच्या चिखलात रुतून जगायचं आहे? ज्यांच्या हातात धर्मग्रंथ त्यांनीच माणुसकीला फाशी दिली, आणि आम्हाला शिकवलं शांत राहा, सहन करा! नामदेव ढसाळ यांच्या कवितांकडे पाहिले तर समाजातील जातव्यवस्थेचे कठोर वास्तव स्पष्ट दिसते. जात बदलली तरी जातीय मानसिकता बदलत नाही, हे त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते. याच पार्श्वभूमीवर कुंडलवाडी येथे घडलेली घटना पाहिली नाही. तर मराठा समाजाच्या तक्रारीवरून महार समाजातील व्यक्तींविरुद्ध गुन्हा क्रमांक ५२ दाखल करण्यात आला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा संदर्भ आला की अशा प्रकारचे गुन्हे गंभीर स्वरूपात नोंदवले जातात आणि आरोपींना सहजपणे जामीन मिळणे कठीण होते, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर कुंडलवाडीत किंवा इतर ठिकाणी अशा प्रकारच्या घटना प्रथमच घडल्या आहेत असे नाही. अनेक वेळा जातीय वाद निर्माण झाल्यानंतर परस्पर तक्रारी, प्रतितक्रारी आणि उलट गुन्हे दाखल करण्याची पद्धत दिसून येते. त्यामुळे हा काही नवीन प्रकार नसून समाजात आधीपासून चालत आलेला एक पायंडाच आहे. या घटनांमधून जातीय तणाव अजूनही संपलेला नाही, तर तो वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा समोर येत असल्याचे दिसते. समाजात न्याय, समता आणि परस्पर आदर निर्माण होण्यासाठी कायद्याचा योग्य वापर आणि सामाजिक संवाद दोन्ही आवश्यक आहेत. Kanthak Suryatal Post Views: 699 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नवभारत माता : वैभव, विषमता आणि शिक्षणाचा प्रश्न अखेर ९६ तासांच्या नाट्या नंतर मदर्स डे च्या दिवशी थलपती जोसेफ विजय मुख्यमंत्री झालेच