नांदेड (प्रतिनिधी)- गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या लेखा (Account) विभागामध्ये अनेक महिन्यांपासून कथितरित्या गायब असलेल्या डोनेशन बुक्स तसेच आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांबाबत समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीप सिंघ नंबरदार, दीपक सिंघ गल्लीवाले, बिरेंद्र सिंघ बेदी, संपूर्ण सिंघ गिल, बक्षीसिंघ पुजारी, सिरताज सिंघ बल यांनी केली आहे.
प्रसिद्धी साठी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या डोनेशन घोटाळ्याचा विषय समोर आला होता. समाजाच्या दबावानंतर संबंधित प्रकरणात FIR दाखल करण्यात आली. मात्र, अनेक महिन्यांपासून लेखा विभागातील जनरल डोनेशन बुक्स गायब असल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणामुळे गुरुद्वारा बोर्डाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे आरोप देखील करण्यात आले आहेत. समाजामध्ये या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी प्रशासक. डॉ.विजय सतबीर सिंघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आणि निवेदनची प्रतिलिपी माननीय जिल्हाधिकारी नांदेड.पोलीस अधीक्षक नांदेड.अधीक्षक गुरुद्वारा बोर्ड व पोलीस निरीक्षक वजीराबाद यांनाही देण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या :
* संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
* गायब असलेल्या डोनेशन बुक्सचा तात्काळ शोध घेण्यात यावा.
* संबंधित अकाउंट विभागाचे H.O.D., सर्व सहायक अधीक्षक, अकाऊंटंट तसेच P.A. to Administrator या सर्व अधिकाऱ्यांना निष्पक्ष चौकशीसाठी तात्काळ निलंबित करण्यात यावे.
* दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
* आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण (Audit) करण्यात यावे.
सामाजिक कार्यकर्ते जगदीप सिंघ नंबरदार दीपक सिंघ गल्लीवाले सह आदींनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, योग्य व पारदर्शक कारवाई न झाल्यास समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
