अवैध व्यवसायाविरोधात नांदेड पोलिसांची मोहिम सुरु; पहिल्याच दिवशी 25 गुन्हे दाखल, 48 आरोपींवर कारवाई

नांदेड  — नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ आणि शस्त्रे यांसारख्या गैरकृत्यांविरोधात विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दिवशी एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 48 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम 1 ते 31 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. परिक्षेत्रातील अधिकारी यांना 28 एप्रिल रोजीच मोहिमेच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या.

पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या कारवाईत, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 7 गुन्हे नोंदवून 27 जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी ₹97,520 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या 17 आरोपींविरोधात 16 गुन्हे नोंदवून, त्यांच्याकडून ₹26,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय शस्त्र अधिनियम व कोटपा अधिनियमांतर्गत प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली असून, एकूण ₹1,24,406 किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेला ‘खबर हेल्पलाइन’ची मोठी मदत मिळत असल्याचे डीआयजी उमाप यांनी नमूद केले. अवैध व्यवसायाविषयी माहिती देण्यासाठी 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून, नागरिक व्हॉट्सअॅपद्वारेही माहिती पाठवू शकतात. नागरिकांच्या सहकार्यामुळे अवैध व्यवसायांच्या निर्मूलनात या हेल्पलाइनचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!