नांदेड (प्रतिनिधी) – शहर व परिसरात घरफोडीच्या घटनांत वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून उस्माननगर व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.
उस्माननगर परिसरातील घटना
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळसांगवी (ता. लोहा) येथे दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी रात्री 10.00 ते 27 एप्रिल रोजी पहाटे 4.00 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याबाबत फिर्यादी मारोती महाजन कदम (वय 38) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 85/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 331(4), 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.
भाग्यनगरमधील घरफोडी
दरम्यान, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाईट नवी नांदेड परिसरातही घरफोडीची घटना घडली आहे. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 ते 25 एप्रिल रोजी सकाळी 10.00 या कालावधीत फिर्यादीच्या बहिणीच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी रोकडेश्वर संजीवराव नरवाडे (वय 24, रा. बाळापूर रोड, धर्माबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 231/2026 नुसार कलम 331(4), 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक केंजळे करीत आहेत.
दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून संशयितांवर लक्ष ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
