नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून

नांदेड (प्रतिनिधी) — गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच नवीन वाडी परिसरात 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल 2026 रोजी उशिरा रात्री घडली. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पूर्णा रोडवरील नवीन वाडी येथे जाणाऱ्या प्रताप दत्ता गायकवाड (वय 26) या युवकावर तीन संशयितांनी हल्ला केला. सोनू बुक्तरे, सुरज  सोनू बुक्तरे  आणि विजय वायवळ या तिघांनी धारदार शस्त्राने प्रतापच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रतापचा मृत्यू झाला असून रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी त्याची अधिकृत नोंद शासकीय रुग्णालयात करण्यात आली.

या हत्येमागे जुन्या वैमनस्याचा धागा असल्याची माहिती पुढे आली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी प्रताप गायकवाड आणि सुरज बुक्तरे यांच्यात वाद होऊन मारहाणीची घटना घडली होती. त्या वेळी सुरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या घटनेचा बदला घेण्यासाठीच हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याची आकडेवारी सादर केली होती. मात्र त्यानंतर लगेच घडलेल्या या हत्येने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आकडेवारी कमी-जास्त होत राहते, पण नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतचा विश्वास टिकवणे हेच पोलिसांसमोरील खरे आव्हान असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना सुद्धा गुन्हेगारांनी असे वेलकम केले आहे. दरम्यान, भाग्यनगर पोलिसांनी दोन  मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायद्याची भीती समाजात कमी होत चालली का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

One thought on “नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!