भारतात जे अनेक समाजसुधारक व धर्मसंस्थापक होऊन गेले त्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशातील जाती व्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता इत्यादी वाईट प्रथा परंपरांवर अत्यंत मार्मिक भाषेत प्रहार करून श्रम प्रतिष्ठा व जाती धर्मातील भिंती पाडून सर्वांना एकत्रित आणून लिंगायत धर्माची स्थापना करणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा लेख.
महात्मा बसवेश्वर यांचा जन्म २६ एप्रिल ११०५ रोजी तत्कालीन मंगळवेढा राज्य व सध्याच्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील बागेवाडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मादराज व आईचे नाव मादलांबिका होते. बसवेश्वर हे त्यांच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य होते. बसवेश्वर यांना बसव, बसवण्णा असे ही संबोधले जाते. महात्मा बसवेश्वर हे त्यांच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळवण्याकरिता कृष्णा व मलप्रभा नदीच्या संगमावरील कुडलसंगम येथील पशुपत शैव अध्ययन केंद्रात गेले व तेथे १२ वर्षे अध्ययन केले. समाजात कोणतेही काम न करणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक होते हे ओळखून महात्मा बसवेश्वर यांनी अशा लोकांचे मन परिवर्तन करून त्यांना श्रमाचे महत्व पटवून दिले. ‘कायकवे कैलास’ म्हणजेच श्रम हेच ईश्वर होय, हा विचार मांडून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली व १२ व्या शतकात श्रमजीवी समाजाची निर्मिती केली.
ब्राह्मण मधुवरस यांची मुलगी कलावती आणि चांभार हरळय्या यांचा मुलगा शीलवंत यांचा आंतरजातीय विवाह बसवेश्वरांनी घडवून आणला पण प्रस्थापित वैदिक समाजाने धर्म बुडविला म्हणून बसवेश्वर यांची तक्रार राजा बिज्जल यांच्याकडे केल्यामुळे राजाने बसवेश्वर यांना हद्दपार ही शिक्षा केली आणि त्यांचे वचन साहित्य जाळून टाकले तसेच शीलवंत, हरळय्या व मधुवरस यांना हत्तीच्या पायाला बांधून देहदंडाची शिक्षा सुनावली. मंदिर म्हणजे बहुजनांच्या अंधश्रद्धा व भोळ्या समजुतीचे केंद्र असून आपल्या अनुयायांनी मंदिरे न बांधण्याचा आदेश महात्मा बसवेश्वर यांनी दिला तसेच देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ असून आपल्या देहालाच देवालय माना असा उच्च कोटीचा विचार त्यांनी सांगितला. ते पुढे म्हणतात मंदिराचा कळस बनून कावळ्याच्या विष्टेने अपवित्र होण्यापेक्षा शरीराच्या पायातील पादुका बनणे मज कुडलसंगमदेवास प्रिय आहे.
देवा संदर्भात बसवेश्वर म्हणतात – दगडाचा देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, रुपयाचा देव देव नव्हे, सोनं देव नव्हे, धातूचा देव देव नव्हे, देव तुमच्या अंतर्यामी आहे.
तसेच देवपूजे संदर्भात ते पुढे म्हणतात – जे देवाला पाणी, दूध, लोणी, तूप, फूल वाहतात किंवा अर्पण करतात त्यांना बसवेश्वर अंधभक्त संबोधतात व पुढे ते म्हणतात. दुग्ध ते उच्छिष्ट वासराचे, पाणी ते मत्स्याचे उच्छिष्ट, पुष्प ते उच्छिष्ट तथा भ्रमराचे, याचा अर्थ दूध हे वासराचे उष्टे, पाणी हे माशांचे उष्टे आणि फुल हे भुंग्यांचे उष्टे आहे अशा उष्ट्या वस्तूने पूजा कशी करावी. महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या जीवन कार्यात ‘शरण चळवळ’ सुरू केली. या चळवळीत सहभागी होणाऱ्या पुरुषांना ‘शरण’ व महिलांना ‘शरणी’ असे संबोधले.या शरण चळवळीचे नंतर लिंगायत धर्मामध्ये रूपांतर झाले. लिंगायत हा शब्द लिंग + आयात या शब्दांपासून बनला आहे. लिंग म्हणजे इष्टलिंग (शिवाचे प्रतीक) आणि आयात म्हणजे धारण करणारा. थोडक्यात लिंग धारण करणारा तो लिंगायत होय. इष्टलिंग हे सगुण शिवाचे प्रतीक असल्याने वर्ण, वेश, लिंग, जात, जन्म ठिकाण असा कोणताही भेदभाव न करणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला लिंग धारण करून लिंगायत होता येते हा विचार बसवेश्वरांनी मांडला.
सुंदर आचरण असलेल्या व्यक्तींची सुंदर रचना म्हणजे वचने होत. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, जातिभेद, स्त्री दास्य, पुरोहितशाही वर प्रहार करणारे क्रांतिकारी विचार वचनांमध्ये आहेत. वचन हा लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ आहे. महात्मा बसवेश्वर यांनी लोकांना भटशाहीपासून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभव मंटपात एकत्र येऊन विचार विनिमय व चर्चा करीत असत. आपले अनुभव मांडत असत. यावरूनच त्याला अनुभव मंटप म्हटले असावे. अनुभव मंटपातील चर्चेतून समता, स्वातंत्र्य, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता व सामाजिक न्याय ही विचार वचने पुढे आली. त्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येते. महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराने प्रभावित होऊन इतर धर्मातील अनेक लोकांनी लिंगायत धर्म स्वीकारला. काश्मीर येथील राजा भूपाल महादेव यांनी आपला राज्यकारभार मुलाला देऊन पत्नीसह शरण बनले. तेव्हा बसवेश्वरांनी राजाला ‘मोळीगे मारय्या’ व राणीला ‘महदेवी’ हे नाव दिले. हे दोघे राजा राणी कल्याण (आजचे बसवकल्याण) येथे मोळी विकण्याचे काम करू लागले. त्यांच्याविषयी बसवेश्वर म्हणतात – भक्तीसाठी दहा बोटांची मेहनत, गणना महाभक्त होण्यासाठी, परी तुझे पोट भरणार नाही, भर होणार तू भूमंडळी त्यात तू राही हाताने परिश्रम तू करी, मिळेल भाकरी सर्वांलागी, मोळीगे मारय्या असून राजा थोर, श्रम भरपूर केले त्याने कुडलसंगमदेवा जो कायक करील त्याला तारील देव माझा.
महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या विचारातून जी शिकवण दिली त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी करू नका व काही गोष्टी करा असे विचार मांडले. .त्यामध्ये- जातिभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. दगडधोंडे पूजू नका, यज्ञ, होमहवन करू नका. ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग पाहू नका. पुरोहितामार्फत पूजा करू नका, नदीत स्नान करू नका. पशुहत्या करू नका, शुभ-अशुभ पाहू नका. अस्पृश्यता पाळू नका, चोरी व हत्या करू नका. मांसाहार करू नका, व्यसन करू नका, एकमेकांच्या पाया पडू नका, मूर्तिपूजा करू नका, खोटे बोलू नका, अज्ञानाचा तिरस्कार करू नका, दुसऱ्यांची निंदा करू नका, रागवू नका. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी होय. कुडलसंगम देवाला प्रसन्न करण्याची हीच रीत आहे असे सांगितले. तसेच स्वकष्ट करा, पर्यावरण रक्षण करा, समाजसेवा करा, सांसारिक जीवन जगा, प्राणीमात्रावर दया करा, नीती, नैतिकता व विचाराने वागा, भुकेलेल्यांना अन्न द्या. मरण महामही आहे त्याचे स्वागत करा, तसेच अनुभव मंटपात एकत्र बसा व चर्चा करा असा संदेश दिला.
महात्मा बसवेश्वरांनी व्यवस्था परिवर्तनाचा संदेश देताना ते म्हणतात, एकांताकडून – लोकांकडे, अज्ञानाकडून – ज्ञानाकडे, दानधर्माकडून – दासोहाकडे (श्रम सेवेकडे), मंदिराकडून – अनुभव मंटपाकडे, देवालयाकडून – देहलयाकडे, वैराग्याकडून – गृहस्थी जीवनाकडे, विषमतेकडून – समानतेकडे, कल्पना, कल्पीत ग्रंथाकडून – अनुभवी वचन साहित्याकडे, अंधश्रद्धेकडून – विवेकवादाकडे, बहुदेवतावादाकडून – एकेश्वरवादाकडे, संस्कृतकडून – लोकभाषा कन्नडकडे, ग्रंथ प्रमाणवादाकडून – कृती प्रमाणवादाकडे, शैव पंथाकडून – लिंगायत धर्माकडे, शिवालयाकडून – इष्टलिंगाकडे, शिष्यत्वाकडून – शरण जीवाकडे चला, असा व्यवस्था परिवर्तनाचा विचार किंवा संदेश मांडला. १२ व्या शतकात भटशाहीच्या थोतांड कल्पना, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्ये, कर्मकांड इत्यादींना फाटा देऊन ७७० अमरगणांना सोबत घेऊन परिवर्तनाची नवीन लाट निर्माण करणाऱ्या क्रांतीकारी समाजसुधारकाचा मृत्यू ११६७ मध्ये झाला. त्यांची समाधी कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामधील कुडलसंगम येथे आहे. अशा प्रकारे १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी मांडलेले विचार आजच्या काळात ही प्रासंगिक व उपयोगी असल्याचे दिसून येते.
- प्रा. डॉ. सुरेश बळीराम गजभारे
नांदेड. मो. ९४२१९९१६३६
