नांदेड (प्रतिनिधी)- महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर मारहाण करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने शिक्षा सुनावली असून सात साक्षीदारांच्या साक्षी आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरला आहे. ६ मार्च २०२१ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास चौफाळा उपविभागातील तंत्रज्ञ विश्वदीप पी. गंगाधर वाघमारे हे थकबाकी वसुलीच्या कामासाठी महंतवाडी परिसरातील भालेश्वर नगर भागात गेले होते. यावेळी आरोपी राजू यादवराव भुजबळे याने घरासमोर बेकायदेशीरपणे विद्युत आकोडा टाकून वीज वापर करत असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्याने अनधिकृत जोडणी काढण्यास सांगितले असता आरोपीने विरोध करत शिवीगाळ केली. त्यानंतर कर्मचाऱ्याने स्वतः आकोडा काढण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच थपडा-बुक्क्यांनी मारून जखमी केले. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१/२०२१ नुसार भा.दं.वि. कलम ३५३, ३३२ व ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस उप निरीक्षक गणेश गोटके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान फिर्यादीसह एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षी व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी राजू भुजबळे यास दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३३२ व ३५३ अंतर्गत प्रत्येकी सहा महिने सक्त कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच दंडाच्या रकमेतून पीडितास ५ हजार रुपये नुकसानभरपाई विश्वदीप पी. गंगाधर वाघमारे यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पी. व्ही. बुलबुले यांनी कामकाज पाहिले.पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पूर्ण केले. Kanthak Suryatal Post Views: 1,473 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकशाहीचा विजय आणि महिला अधिकारांचा लढा-प्रियांका गांधींची भूमिका 16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित;जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई;होलसेलर वर कार्यवाही कधी ?