नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाणे सध्या कायदा अंमलबजावणीपेक्षा “डॉक्टरकी”कडे वळल्याचं दिसतंय. येथे कार्यरत असलेले डॉक्टरने तर थेट नवीन उपचारपद्धतीच शोधून काढली जिथे सापडेल तिथून उचल, आणि दुसऱ्याच्या नावावर टाक!
म्हणतात ना, उंटावरून शेळ्या हाकणं, तसंच काहीसं या प्रकरणात दिसतंय. इस्लामपुरा भागात शेख उमर यांच्या पानपट्टीत सापडलेला गुटखा, केळी मार्केटमधील सचिन शत्रुघ्न कोटलवार यांच्या दुकानात ट्रान्सफर झाल्याचं अद्भुत दर्शन घडलं आहे. कायद्याच्या पुस्तकात नसलेली ही “गुटखा स्थलांतर योजना” पाहून नागरिकही थक्क!
२२ मार्च रोजी सायंकाळी ७:५० वाजता केळी मार्केटमध्ये कारवाई झाल्याचा दाखला देत भारतीय न्यायसंहितेच्या कलम १२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा क्रमांक ७९/२०२६ दाखल. पण गंमत अशी की, मूळ माल इस्लामपुरात सापडलेला आणि गुन्हा केळी मार्केटमध्ये फुललेला!
“जशी करणी तशी भरणी” ही म्हण इथे थोडी बदलावी लागेल “जिथे करणी, तिथे नाही भरणी; जिथे भरणी, तिथे नाही करणी!”
तक्रारदार म्हणून पोलीस नाईक केशव शंकरराव यांचं नाव पुढे आलं असलं, तरी नेमका खेळ कुठे झाला, कोणी केला, का केला आणि कसा केला याचं कोडं अजूनही सुटलेलं नाही. नागरिक विचारतायत “घरचा आहेर दुसऱ्याच्या डोक्यावर का?”
एकूण काय, इतवारा पोलिसांनी न्यायव्यवस्थेला नवा “क्लिनिकल टच” दिलाय. आता पुढे कदाचित गुन्हेही रुग्णांप्रमाणे हलवले जातील!
“कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” या म्हणीचं जिवंत उदाहरण सध्या केळी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय. पुढे काय होणार? “ढोल मोठा, आवाज पोकळ” की खरोखर चौकशी?
नागरिक मात्र एकच म्हणतायत —
“अति शहाणपणाचं लक्षण म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं!”
