महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. अशोक खरात नावाचा हा तथाकथित बाबा जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ, मांत्रिक, आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणवतो प्रत्यक्षात एक विकृत आणि धोकादायक गुन्हेगारी जाळ्याचा केंद्रबिंदू असल्याचा संशय बळावतो आहे. एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, आणि तपासादरम्यान त्याच्याकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. हे फक्त एक प्रकरण नाही, तर वर्षानुवर्षे चालत आलेल्या शोषणाच्या रॅकेटचा पर्दाफाश असल्याची शक्यता आहे. या व्हिडिओंमध्ये काही उच्चभ्रू, सेलिब्रिटी आणि राजकीय वर्तुळातील लोकांचा संबंध असल्याची चर्चा अधिकच गंभीर प्रश्न निर्माण करते. हा माणूस नेमका कोणाच्या आशीर्वादाने इतक्या बिनधास्तपणे वावरत होता? कोणाच्या छत्रछायेखाली हे घाणेरडे साम्राज्य उभं राहिलं? नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अंकेशवर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला हा खरात, स्वतःच्या अंकशास्त्र आणि अघोरी उपायां च्या नावाखाली लोकांना फसवत होता. अंधश्रद्धा, भीती आणि लोभ यांचा वापर करून त्याने महिलांचे शोषण केले, असा गंभीर आरोप आहे. समाजातील प्रभावशाली लोकांशी जवळीक साधून त्याने स्वतःभोवती संरक्षण कवच उभं केलं आणि हीच गोष्ट सर्वात चिंताजनक आहे. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींचे फोटो, भेटीगाठी आणि संबंध समोर येत आहेत. यामुळे संशय अधिकच गडद होतो. राज्य महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेच्या प्रमुखांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. एका वर्षापूर्वीच या व्यक्तीविरोधात तक्रारी आणि संकेत होते, तर त्यावर ठोस कारवाई का झाली नाही? उलट संबंधितांना दबाव टाकून गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला का? महिला संरक्षणासाठी स्थापन झालेल्या यंत्रणांनीच जर दुर्लक्ष केलं, तर सामान्य महिलांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचं? हा प्रश्न आता थेट जनतेसमोर उभा आहे. हे प्रकरण फक्त एका विकृत व्यक्तीपुरतं मर्यादित नाही. ही संपूर्ण व्यवस्था, अंधश्रद्धा, राजकीय पाठबळ आणि सत्तेच्या गैरवापराची साखळी उघडी पाडणारी घटना आहे. त्यामुळे आता मुद्दा अशोक खरात कोण आहे? हा नाही, तर त्याला वाचवणारे आणि वाढवणारे कोण आहेत? हा आहे. गृहमंत्रालयाने या प्रकरणाची खोलवर, निष्पक्ष आणि कठोर चौकशी केलीच पाहिजे. फक्त एका आरोपीला अटक करून हा विषय मिटवता येणार नाही. या घाणेरड्या जाळ्याच्या मुळाशी जाऊन प्रत्येक दोषीला उघडं पाडणं आणि शिक्षा देणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर डाग लावणाऱ्या या प्रकरणाचा शेवट सत्य आणि न्यायानेच झाला पाहिजे. अन्यथा जनतेचा विश्वास पूर्णपणे ढासळेल. Kanthak Suryatal Post Views: 946 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बँक ऑफ महाराष्ट्र चिखलवाडी शाखेचा अजब कारभार; खाते उघडण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी इराणने आगीचा बदला अनेक आगी लावून घेतला