काल रात्री पश्चिम आशियातील तणावाने अक्षरशः स्फोटक रूप धारण केले. मध्यरात्रीच्या सुमारास अमेरिकन लष्करी हालचाली नंतर अवघ्या एका तासात इराणकडून संयुक्त अरब अमिरातीतील महत्त्वाच्या ठिकाणांवर जबरदस्त हल्ल्यांची मालिका सुरू झाल्याचे अहवाल समोर आले. या हल्ल्यांचे सर्वात मोठे लक्ष्य ठरले ते म्हणजे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वात व्यस्त आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे विमानतळ. रात्रीच्या काळोखात अचानक आकाशात प्रचंड आगीचे डोंब उसळू लागले, स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू येत होते आणि संपूर्ण परिसर भीतीच्या छायेत गेला. सकाळ उजाडली तरी परिस्थिती नियंत्रणात आली नव्हती. विमानतळ परिसरातून अजूनही धुराचे प्रचंड लोळ उठताना दिसत होते. या घटनेमुळे संपूर्ण युनायटेड अरब अमिरात मध्ये प्रचंड खळबळ उडाली. प्रवासी, विमानतळ कर्मचारी, परदेशी कामगार आणि व्यावसायिक सगळ्यांमध्ये एकच प्रश्न होता: पुढे काय होणार? मागील सुमारे दोन आठवड्यांपासून इराण आणि अमेरिकेतील तणाव प्रचंड वाढला होता. या काळात इराणने अमेरिकेशी संबंधित अनेक आर्थिक व लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे दावे करण्यात आले. मात्र कालचा हल्ला वेगळा होता. कारण यावेळी लक्ष्य होते थेट जागतिक अर्थव्यवस्थेचे एक मोठे केंद्र दुबई. हल्ल्यांची तीव्रता इतकी होती की विमानतळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी आपली घरे सोडण्यास सुरुवात केली. काही कुटुंबे सुरक्षिततेसाठी दुसऱ्या शहरांकडे निघाली, तर अनेक श्रीमंत परदेशी नागरिकांनी तातडीने महागड्या चार्टर फ्लाइट्स बुक करून दुबई सोडण्याचा प्रयत्न केला. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुबईचे महत्त्व फक्त पर्यटनापुरते मर्यादित नाही. येथे जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रादेशिक मुख्यालय आहेत. अँपल,मायक्रोसॉफ्ट,गुगल, सिटीबँक आणि बँक ऑफ अमेरिका यांसारख्या अमेरिकन कंपन्या दुबई मधून संपूर्ण मध्यपूर्वेतील आर्थिक व्यवहार नियंत्रित करतात. त्यामुळे दुबईवर हल्ला म्हणजे प्रत्यक्ष अमेरिकन आर्थिक शक्तीवर प्रहार, असा संदेश दिला जात असल्याचे अनेक विश्लेषक मानतात. याच कारणामुळे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड म्हणजेच Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) साठी दुबई हे एक अत्यंत महत्त्वाचे लक्ष्य ठरले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. दुबईला जर आर्थिकदृष्ट्या हादरा बसला, तर संपूर्ण पश्चिम आशियातील अमेरिकन व्यावसायिक संरचना कमकुवत होऊ शकते. हल्ल्यांचा दुसरा मोठा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे फुझेराह हे बंदर शहर. येथे तेल साठवणूक केंद्रे आणि निर्यात सुविधा आहेत. या भागातही मोठे स्फोट झाल्याचे सांगितले जाते. तेल साठवण टाक्यांना आग लागल्याने आकाशात काळ्या धुराचे ढग पसरले. उपग्रह चित्रांमध्येही या भागात मोठे नुकसान झाल्याचे संकेत दिसत असल्याचे काही अहवाल सांगतात. फुजैराहचे महत्त्व एका अत्यंत रणनीतिक कारणामुळे आहे. अबू धाबी पासून फुजैराहपर्यंत सुमारे ४०० किलोमीटर लांबीची तेल पाइपलाईन तयार करण्यात आली आहे. या पाइपलाईनमुळे तेल थेट अरबी समुद्रात पोहोचते आणि त्यामुळे जगातील अत्यंत संवेदनशील समुद्री मार्ग असलेल्या Strait of Hormuz वर अवलंबून राहण्याची गरज कमी होते. जर ही पाइपलाईन कार्यरत राहिली, तर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखण्याचा प्रयत्न केला तरी तेल निर्यात सुरू राहू शकते. त्यामुळेच इराणने या पाइपलाईनवर हल्ला करून ती निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केल्याचे विश्लेषकांचे मत आहे. काही अहवालांनुसार पाइपलाईनला मोठे नुकसान झाले आहे. या घटनांमुळे संपूर्ण अरब प्रदेशात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इराणचे खरे लक्ष्य नेमके काय आहे? नागरी भागांवर थेट हल्ले टाळत इराण मुख्यतः आर्थिक आणि लष्करी पायाभूत सुविधांवर प्रहार करत असल्याचे दिसते. इराणचा आरोप असा आहे की अरब देश अमेरिकेला आपल्या भूमीवर सैनिकी तळ उभारण्याची परवानगी देतात आणि त्यातूनच अमेरिकेची मध्यपूर्वेत दादागिरी वाढते. दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्याशी संबंधित धोरणांवरही चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने जर हवाई कारवाया थांबवल्या तर इराणही शांत होईल का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु इराणची भूमिका स्पष्ट आहे: अरब देशांमधील अमेरिकन सैनिकी उपस्थिती संपल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही. या संघर्षाचा खरा अर्थ असा आहे की हा केवळ दोन देशांमधील वाद नाही. हा जागतिक आर्थिक आणि सामरिक शक्तींचा संघर्ष आहे. दुबईसारख्या आर्थिक केंद्राला हादरा देणे म्हणजे जागतिक वित्तीय व्यवस्थेलाच धक्का देण्याचा प्रयत्न होय. आज पश्चिम आशियात जे घडत आहे ते केवळ स्थानिक संघर्ष नाही. जर ही परिस्थिती आणखी चिघळली, तर त्याचे परिणाम तेल बाजारापासून ते जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वत्र जाणवू शकतात. आणि म्हणूनच आज जगभरातील धोरणकर्ते एकाच प्रश्नाकडे चिंतेने पाहत आहेत, हा संघर्ष आता कुठे थांबणार? Kanthak Suryatal Post Views: 718 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भारतीय जनतेच्या प्रेमा मूळे हार्मोन्झ समुद्र धुनीतून जहाजे सोडली इतर कोणामुळे नाही अमेरिकेच्या सांगण्यावरून पकडलेले तीन टँकर सोडून भारत युद्ध रोखण्याच्या स्थितीत येणार काय ?