वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी 55 हजार रुपयांची मागणी; तडजोडीनंतर 30 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू
मंठा (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी सापळा कारवाई करत मंठा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता मागितल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे एका 38 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार मंठा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार रवी गणपत जाधव (वय 38) यांनी तक्रारदाराच्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. त्यापैकी 10 हजार रुपये आधीच घेतले असून उर्वरित 40 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. तसेच स्वतःसाठी आणखी 5 हजार रुपये मागितल्याचे पडताळणीत समोर आले.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर 12 मार्च 2026 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड (वय 50) यांनी देखील आरोपी जाधव यांना लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच अवैध वाळू वाहतुकीच्या दोन गाड्या पकडून दिल्यास एका गाडीच्या महिन्याच्या हप्त्यात सूट देण्याचीही मागणी केल्याचे समोर आले.
त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. मंठा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत आरोपी पोलीस अमलदार रवी जाधव यांनी तक्रारदाराकडून तडजोडीनंतर 30 हजार रुपये लाच स्वीकारताच सापळा पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपी क्रमांक 1 रवी जाधव यांच्या अंगझडतीत 30 हजार रुपयांची लाच रक्कम व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपी क्रमांक 2 मनोज कुमार राठोड यांच्याकडूनही मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही मोबाईलचे विश्लेषण सुरू असून घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईस मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांनी केले. तपास पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर करीत आहेत. सापळा पथकात पोलीस हवालदार राजेंद्र सिनकर, अशोक नागरगोजे व सी.एन. बागुल यांचा सहभाग होता.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1064, व्हॉट्सॲप क्रमांक 7720891064 तसेच पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर (मो. 9011092777) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
