​महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे

जागतिक महिला दिनानिमित्त संगिता बडवणे यांचे प्रतिपादन; जवळा देशमुख येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
 
नांदेड- भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा आणि मतदानाचा अधिकार दिला आहे.. कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास आणि इतर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या कायदेशीर अधिकारांची माहिती असणे गरजेचे आहे.  समाजाच्या उत्कर्षासाठी, सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी  महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे यांनी केले. त्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर यांची उपस्थिती होती. 
          जागतिक महिला दिनानिमित्त लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माता पालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. संगिता बडवणे आणि विद्यार्थीनिंनी माता पालक इंदिरा पांचाळ, मालतीबाई गच्चे, सरिता गच्चे, मनिषा गच्चे, सुलोचना गच्चे, प्रतिभा गोडबोले, करुणाताई गच्चे यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच माता पालकांच्या वतीने शिक्षिकांचा सन्मान केला. या निमित्ताने संगिता बडवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आणि हक्क यांबरोबरच  जागतिक महिला दिनाचे महत्त्व व तो का साजरा करतात याचीही माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या गच्चे हिने केले तर आभार मयुरी गोडबोले हिने मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!