कंधार/नांदेड (प्रतिनिधी)- उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षकांना लाच घेतल्याप्रकरणी कंधार येथील विशेष न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर नांदेडमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी करून देतो असे सांगून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरोपीला विशेष न्यायाधीश मा. एच. डी. तावशीकर यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका विद्या बळवंत वांगे, सहशिक्षक रामेश्वर शामराव पांडागळे आणि गौतम जयवंतराव सोनकांबळे यांना 1,200 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. या तिघांना आज कंधार न्यायालयात पोलीस निरीक्षक करीम खान पठाण यांनी हजर केले. यावेळी तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश पाटील यांनी तिघांनाही 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दुसऱ्या एका प्रकरणात, एका तक्रारदाराच्या मुलीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून देतो असे सांगून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारणारा आरोपी साहेबराव नागोराव गुंडले यालाही काल अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता विशेष न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी त्याला उद्या, 31 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या ..
महिला मुख्याध्यापकासह इतर दोन शिक्षक अडकले १२०० च्या लाच जाळ्यात
