शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन पूर्वाश्रमीचे लखिशा बंजारा यांची ही भूमी आहे. पंजाब मधील खैरपूर तालुका-अलीपूर जिल्हा-मुजफ्फरगड येथे ४ जुलै १५८० रोजी त्यांचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे.
वडील गोधु बंजारा वडतिया जाधव व्यवसायाने सिव्हील ठेकेदार होते. आजोबा ठाकूरदास बंजारा वडतिया जाधव योद्धा व कुशल व्यापारी होते. नागैया, हेमा, हरी,सितु,पांडरा,बक्षी, बाला, जवाहर ही मुले तर सितो नावाची मुलगी लखिशा बंजारा यांना होती. १७ नातू व २४ पणतू असा मोठा परिवार होता. १६०८ मध्ये गोराम पवार परिवारातील कांतोबाईसोबत विवाह झाला.
लखिशा बंजारा यांना ९९ वर्षे १० महिने एवढे आयुष्य लाभले. नवी दिल्ली येथे रायसिना, मालचा, बाराखांब आणि नरेला ही गावे त्यांनी वसविली आहेत व ८० तांड्याची मालकी होती. राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली चार गावांची १२३३ एकर जमीन लखिशा बंजारा यांच्या नावाने महसूल रेकॉर्डवर होती,
मथुरा वृंदावन जयसिंगपूर येथे आजही लखिशा बंजारा यांची सात एकर महसुली जमीन असून उदासीन आश्रम यांचे ताब्यात आहे. तेथे लेंगी व बंजारा होळी साजरी केली जाते. बुंदेलखंडमधील सागर परिसरात राय लखिशा बंजारा यांना लोकनायक म्हणून आदरार्थी ओळखले जाते. सागर तलाव लखिशा बंजारा यांच्या नावाने आजही ओळखला जातो. सागर तलावाजवळ लखिशा बंजारा यांचा पुतळा असून परिसरात ऐतिहासिक स्थळे व मंदिरे आहेत.
दानशूर लखिशा बंजारांनी लोककल्याणासाठी शेकडो तलाव बांधले, विहिरी खोदल्या व्यापारी मार्गावर १० किलोमीटर अंतरावर तांडा, मुक्कामासाठी धर्मशाळा बांधल्या. लखिशा यांनी निर्माण केलेल्या विहिरी आजही बंजारा बावडी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दगडावर राय लखिशा बंजारा यांचे नाव कोरले असल्याचे आजही पहावयास मिळते.
फारसी भाषेतील शहा व भारतीय भाषेतील राय या दोन्ही शब्दांचा अर्थ राजा असा होतो. बाबा बंदासिंह बहादूर यांनी लोहगड किल्ल्याची निर्मिती केली. किल्ला निर्माण कार्यात लखिशा बंजारा यांचे खूप मोठे योगदान राहिले होते. बांधकामासाठी लागणारे कारागीर, मजूर, दगड, चुना इत्यादी साहित्य त्यांनी पुरविले. हरियाणा मधील यमुनानगर जिल्हा आणि हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्यात लोहगड किल्ला ७ हजार एकर भूक्षेत्रात विस्तारला आहे. लोहगड किल्ला, लाल किल्ला, बंजारा विश्रामस्थल आणि गुरुद्वारा रकबगंज ही त्यांची ऐतिहासिक संस्मरणीय कृती याची साक्ष देत आहे.दिल्लीचा लाल किल्ला लखिशा बंजारा यांच्या २५५ एकर क्षेत्रात निर्माण केला गेला आहे. किल्ल्याला दक्षिण दिशेला लाहोर मुख्यद्वार, दुसरा मुख्यद्वार दिल्ली गेट आणि यमुना नदीकडे असलेला वॉटर गेट अशी रचना केलेली आहे.
लखिशा बंजारा हे शूरवीर व दानशूर योद्धा होते. धर्म स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे शिखांचे नववे गुरू तेगबहादूर यांचे मृत शरीर मिळविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावून त्यांचा अंतिम संस्कार रायसिना रकाबगंज दिल्ली येथे केला व रक्षा एका घटात भरुन जमिनीत पुरली. गुरू तेग बहादूरसिंह यांचे शिर भाई जेता बंजारा यांनी दि १६ नोव्हेंबर १६७५ रोजी त्यांचे पुत्र गोविंद राय यांना सुपूर्द केले व १७ नोव्हेंबर रोजी आनंदपूर साहिब येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.जगातील ही एकमेव घटना आहे की, शरीर व शिर याचा अंत्यसंस्कार दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आला.१५ जानेवारी १७८३ रोजी लखिशा बंजारा वडतिया यांच्या घराची एक भिंत बांधकामासाठी पाया खोदणे सुरू होते तेंव्हा जमिनीत पुरून ठेवलेला घट निघाला. हे स्थळ आजच्या संसद भवन समोरच आहे. आता तेथे लखिशा बंजारा यांचे स्मरणार्थ भाई लखिशा बंजारा हॉल बांधण्यात आला आहे.रायसिना टेकडीच्या बाजूला मालचा तांड्यात लखिशा बंजारा यांनी दि २८ मे १६८० रोजी दिल्ली मालचा पॅलेस मध्ये अखेरचा श्वास घेतला. लखिशा बंजारा हे महान सेनानी आपले प्रेरणास्थान म्हणून सदैव संस्मरणीय राहील.

अवि जी. चव्हाण
नांदेड. मो :- 9763291774

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!