“अखेर येन केण प्रकारेण , कसेही करून मुंबई ताब्यात!”
अखेर येन केण प्रकारेण, कसेही करून हा प्रकारच म्हणावा लागेल. भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करत मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवला आहे. मात्र हा ताबा स्थैर्याचा नसून, भविष्यातील मोठ्या उद्रेकाची ठिणगी ठरणार आहे, हे नक्की.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने काय केले नाही, याचीच यादी मोठी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या असंख्य व्हिडिओंमधून एकच चित्र स्पष्ट होते पाण्यासारखा पैसा वाहवण्यात आला. कारण साधे आहे: मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ७५ हजार कोटी रुपयांचा आहे. अरुणाचल प्रदेशसारख्या संपूर्ण राज्याच्या बजेटपेक्षाही कितीतरी पटीने मोठा. त्यामुळेच या सोन्याच्या खाणीवर ताबा मिळवण्यासाठी भाजपने आपले सर्व काही पणाला लावले.
यावेळी मतदान प्रक्रियेत वापरले जाणारे हातावरचे निशाण मार्कर पेनचे होते, जे अवघ्या दोन मिनिटांत पुसले जात होते याचेही व्हिडिओ व्हायरल झाले. पैसे देतानाचे व्हिडिओ, भेटवस्तू वाटतानाचे व्हिडिओ, खुलेआम होणारे गैरप्रकार हे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नाकाखाली सुरू होते. पण निर्णय अधिकारी तर आधीच निकाल ठरवून बसलेले होते, अशीच भावना निर्माण होते.
पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दोन-दोन महिने अंदाज बांधले जात असत. यावेळी मात्र निवडणुकीआधीच अनेक तथाकथित सर्वे संस्थांनी भाजपच मुंबई जिंकेल, असे भाकीत केले आणि तेच “खरे” ठरले.
यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर अत्यंत परखड शब्दांत म्हणाले की, “आज न्यायालयांमधूनही भाजपला हव्या त्या प्रकारचे निर्णय मिळत आहेत.”
काल-परवाच मणिकर्णिका घाटावरील शिवमंदिर तोडण्यात आले. देवाधिदेव महादेवाचे स्थान हटवले गेले म्हणजे आपल्या मित्रासाठी जागा मोकळी करून देण्यात आली. आता देवापेक्षा मोठा कोण, हे वाचकांनीच ठरवावे.
मणिकर्णिका घाटातील शिवमंदिर पाडणे म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानातील बुद्धमूर्तींशी केलेल्या वर्तनासारखेच आहे, असे परुळेकर ठामपणे सांगतात. ते पुढे म्हणतात, “आपले पंतप्रधान आज बाबा झाले आहेत कधी त्रिशूल, कधी डमरू. म्हणजे ते स्वतःला शिवापेक्षा कमी समजत नाहीत.”
याच नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना “दगडाच्या मूर्तींमध्ये काय आहे?” असे विधान केले होते ते आजही उपलब्ध आहे.
परुळेकरांच्या मते, आज भारतीय जनता पार्टी चीन आणि रशियाच्या मार्गावर चालली आहे. पण भारत त्या मार्गावर चालू शकत नाही. भारत वेगवेगळ्या राज्यांचा, वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा असलेला देश आहे. इथे विविधतेचा सन्मान करून एकत्र जगले जाते; हुकूमशाही पद्धतीने नाही.
आज चार-पाच हिंदी भाषिक राज्यांचे नेतेच संपूर्ण देशावर आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर भाषिक, इतर संस्कृती असलेल्या राज्यांशी जो तुच्छतावादी व्यवहार केला जात आहे, तो उद्या मोठ्या उद्रेकाचे रूप घेईल, याची जाणीव त्यांना नाही की जाणीव असूनही ते दुर्लक्ष करत आहेत?
एका मुलाखतीत राजू परुळेकर म्हणाले, “मी आज जाणीवपूर्वक अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरत आहे. याचा परिणाम काय होईल हे मला माहीत आहे. पण हे शब्द वापरले नाहीत, तर मी माझ्या राज्याच्या आणि स्वतःच्या सन्मानाशी बेईमानी करेन.”
ते पुढे इशारा देतात आज ज्या ताकदीने भाजपविरोधात आवाज उठवला जात आहे, उद्या उद्रेक झाला तर त्याला सामोरे जाण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांनी ठेवावी. भाजपच्या स्वभावाचे विश्लेषण करताना परुळेकर म्हणतात की, “हे क्राइम अगेंस्ट ह्यूमयुनिटी आहे.” ‘द वायर’ या संकेतस्थळावरील एका स्टोरीत सरकारच्या छत्राखाली गुन्हेगारी टोळ्या चालवल्या जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यालाही परुळेकरांनी दुजोरा दिला आहे.
त्यांचा ठाम निष्कर्ष असा आहे—
मुंबई महानगरपालिकेत भाजपचा विजय म्हणजे विकासाची सुरुवात नाही, तर उद्रेकाच्या उत्तरकथेची पहिली पायरी आहे.
