भोकर : महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही मोहीम आहॆ. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहॆ. मोहिमे अंतर्गत भोकर एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, असे नियोजन भोकर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार व भोकर आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
– मोहिमेचे स्वरूप :-
सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन २००८ पासून प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागात राबविला जात आहे. भोकर शहरात दि. १५ जाने ते दि.७ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य सेविका श्रीमती सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड, मुक्ता गुट्टे, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, योगेश पवार, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सिकलसेल आजार म्हणजे काय ?
सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांकडे येतो. सामान्यतः रक्तातील लाल पेशी गोलाकार असतात, परंतु सिकलसेल मध्ये त्या विळ्याच्या आकाराच्या व ताठर बनतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन खालील समस्या उद्भवतात:
– सिकलसेल क्रायसिस: रक्तपुरवठा खंडित झाल्याने असह्य वेदना होणे.
– अवयवांचे नुकसान: प्लीहा (Spleen), हाडे, फुफ्फुस, यकृत आणि मेंदूवर गंभीर परिणाम होणे.
– रोगप्रतिकारशक्ती: संसर्गाचा धोका वाढणे व रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.

* लक्षणे •:-
– रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे.
– हाता-पायावर सूज येणे व भूक मंदावणे.
– सांधे दुखणे आणि असह्य वेदना होणे.
– लवकर थकवा येणे व चेहरा निस्तेज दिसणे.
* प्रतिबंधात्मक उपाय :-
– विवाहपूर्व तपासणी: लग्नापूर्वी सिकलसेलची तपासणी करणे अनिवार्य आहे.
– जोडीदाराची निवड: लाल (SS) आणि पिवळे (AS) कार्ड असलेल्या व्यक्तींनी आपापसात विवाह टाळावा.
– गर्भाची तपासणी: सिकलसेल ग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर ८ आठवड्यांच्या आत गर्भाची तपासणी करून घ्यावी.
* उपचार आणि सवलती :-
सिकलसेलवर पूर्ण उपचार नसला तरी योग्य औषधोपचार आणि जीवन शैलीने नियंत्रण मिळवता येते:
– फोलिक ॲसिड गोळ्यांचे नियमित सेवन व भरपूर पाणी पिणे (८ ते १० ग्लास).
– समतोल आहार : मासे, अंडी, पालेभाज्या, कडधान्ये यांचा आहारात समावेश करणे.
– शासकीय लाभ : सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळते. १० वी व १२ वीच्या परीक्षेत अशा विद्यार्थ्यांना प्रति तास २० मिनिटे जादा वेळ दिला जातो. तसेच एसटी बस प्रवासात सवलत दिली जाते.
भोकर शहरातील नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी असे आवाहन – डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाच्या १०४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
