नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव यांच्या भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम याविषयी या लेखातून ऊहापोह करण्यात आला आहे.
भारतीय आध्यात्मिक आणि संत परंपरा ही विविध काळात, विविध प्रदेशात जन्मलेल्या थोर विभूतींनी समृद्ध झालेली आहे. या परंपरेत शीख धर्माचे नववे गुरू, हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि महाराष्ट्रातील म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांचे कार्य, विचार आणि त्याग हे धर्मरक्षण, मानवता, समता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात.
संत नामदेव महाराज हे १३ व्या-१४ व्या शतकातील महान भक्त संत असून त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात समता, नामस्मरण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पात, उच्च-नीच भेद नाकारून त्यांनी सामान्य जनतेला ईश्वरभक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून मानवता, करुणा आणि सामाजिक ऐक्याचे तत्त्व प्रभावीपणे मांडले गेले. संत नामदेव महाराजांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित न राहता उत्तर भारतापर्यंत पोहोचली. त्यांचे अनेक अभंग पंजाबी भाषेत आहेत.
दुसरीकडे, १७ व्या शतकात शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवाधिकार आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी अद्वितीय बलिदान दिले. तत्कालिन शासकाच्या धार्मिक अत्याचारांविरुद्ध उभे राहत, त्यांनी काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी प्रसंगी आपले प्राण अर्पण केले. धर्मासाठी शिश कापले गेले, परंतु त्यांनी कधीही अन्यायासमोर शरणागती पत्करली नाही. त्यामुळेच त्यांना हिंद दी चादर ही गौरवपूर्ण उपाधी प्राप्त झाली आहे.
संत नामदेव आणि श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या काळात सुमारे तीन शतकांचे अंतर असले, तरी त्यांच्या विचारांमध्ये मूलभूत समानता आढळून येते. दोघांनीही ईश्वर एकत्व, मानवमूल्ये, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. संत नामदेवांनी भक्तीच्या मार्गाने समाजपरिवर्तन घडविले, तर गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी त्याग आणि बलिदानाच्या मार्गाने धर्मरक्षणाचा आदर्श निर्माण केला.
विशेष म्हणजे, संत नामदेव महाराजांचे अभंग शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. यावरून संत नामदेव यांच्या विचारांचा शीख धर्मपरंपरेवर झालेला प्रभाव स्पष्ट होतो. हा संबंध भारतीय संत परंपरेतील सांस्कृतिक एकात्मतेचे आणि सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण आहे.
आजच्या काळात श्री गुरू तेग बहादूर आणि संत नामदेव यांच्या विचारांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सलोखा, मानवाधिकार आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते. श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान आणि संत नामदेव यांची भक्तीपर परंपरा ही भारतीय समाजाला एकता, सद्भावना आणि राष्ट्रभावनेच्या दिशेने नेणारी दीपस्तंभ ठरते. त्यामुळे आज त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतवर्ष विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्यांना अभिवादन करत आहे.
– चंद्रकांत कारभारी, उपसंपादक,
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
