स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी;30 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन 

प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याची मुदत जाहीर 

नांदेड –  मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी दि. 1 जानेवारी, 2026 ते 30 जानेवारी, 2026 असा निश्चित करण्यात आला आहे.

या पुरस्कारासाठी दि. 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्तीची पुस्तके पात्र राहणार आहेत. या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.  स्पर्धेची सविस्तर नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई–400025 येथे तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील (सामान्य शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘नवीन संदेश’ व ‘What’s New’ या सदरात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लेखक किंवा प्रकाशक यांनी प्रवेशिका पूर्णतः भरून आवश्यक कागदपत्रांसह व पुस्तके दि. 30 जानेवारी, 2026 पर्यंत पोहोचतील अशा प्रकारे पाठवावीत. मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात पाठवाव्यात. तर अन्य जिल्ह्यांतील लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रवेशिका व पुस्तके सादर करावीत. प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर किंवा पाकिटावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!