आपल्या देशात गतीमान पध्दतीने रस्तेविकास सुरू आहे सोबतच याचा हातभार देशाच्या विकास गतीला उभारी देण्यात होत आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी या गतिमानतेसोबतच देशात अपघात आणि त्यात होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब आहे.
आपण नुकतेच नव्या वर्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सन 2025 ची आकडेवारी समोर आली आहे या नुसार देशात वर्षभरात 9 लाख 72 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला आहे. सरासरीचा विचार करता दिवसाला साधारण 471 जण या अपघातात प्राणास मुकले आहेत. महिन्याला 14 हजारांहून अधिक (14130) अपघातात मरण पावले आहेत. अपघात वाढले याचे मुख्य कारण अर्थात गतीचे वेड असणारी नवी पिढी होय. होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकी वाहनचालकांचे प्रमाण जास्त आहे. शासन विविध स्तरावर जनजागृती आणि सुरक्षा उपाय करीत आहे. त्यानंतरही हे अपघात होत आहेत. अपघातात प्राण गमावणाऱ्यांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांमध्ये असल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. झालेल्या अपघातांचे विश्लेषण करताना हे स्पष्ट झाले की या सर्व अपघाती मृत्यूमागे ओव्हरस्पीडिंग अर्थात मर्यादेबाहेर गती हेच कारण आहे. देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारत आहे. या सर्व महामार्गावरील अपघात झालेल्या मृत्यूंची संख्या 29 हजारांहून अधिक आहे. हे प्रमाण मागील (2024) वर्षाच्या तुलनेत 50 टक्के अधिक आहे आणि कारणांचा विचार करता यातही गती नियमाचा भंग हेच प्रमुख कारण आहे. अपघाताची अन्य कारणे बघताना अनेक ठिकाणी खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे याचाही यात मोठा दोष जाणवतो. ही समस्या ग्रामीण भागात अधिक आहे. नव्या तंत्रासोबत वाहने येत असल्याने सुरक्षा वाढली आहे. तथापि याचा वापर न करण्याची एक मुळ प्रवृत्ती असते. त्यामुळे देखील अपघातात मृत्यूंचे प्रमाण वाढते.
* दुचाकीवर तीन जणांनी प्रवास करणे.
* हेल्मेटचा वापर करणे
* कारमध्ये सीटबेल्ट न लावणे
* वाहनाचा हेडलाईट नादुरूस्त असलेल्या स्थितीतही प्रवास
* क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक
* स्कूल बस विशेषत: रिक्षात होणारी कोंबा कोंबी
* वाहतूक संकेतक (सिग्नल) पालन न करणे
* राँग साईड वाहन दामटणे
आदी कारणांनी अपघात आणि त्यात मृत्यू असा प्रकार सामान्यत: दिसतो.
वाहन चालवताना वेगाचं वेड बाजूला ठेवलं तर अर्धे अपघात कमी होतील अपघाताच्या कारणांमध्ये आता नव्याने पडलेली भर अर्थातच सोशल मिडिया वरील ‘रिल्स’ होय. गेल्या वर्षभरात रिल्सच्या नादापायी मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आणि त्यात मृत्यूची संख्या वाढताना दिसली.ठिकठिकाणी होणाऱ्या अपघातात आणखी कारणे आहेत. यात पावसाळ्यात पुलावर पाणी वाहत असताना त्यात वाहन टाकणे, हिवाळ्यात धुक्यामुळे द्श्यमानता कमी असताना होणारे ओव्हरस्पीडींग तसेच उन्हाळ्यात वाहनाच्या टायरमध्ये होणारी हवेची वाढ अशीही कारणे आहेत.मुळात जीव आपला आहे तो मोलाचा आहे याची जाणीव ठेवून जबाबदारीने वाहन चालवणे तसेच सर्व सुरक्षा उपायांचा व साधनांचा वापर करणे याला महत्तव आहे. आपलं एक घर आहे आणि घरी वाट पाहणारं दार आहे… जाणीव ठेवा आणि अपघात टाळा…
(प्रशांत दैठणकर)
प्र.उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय,
छत्रपती संभाजीनगर
