देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान; देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न

नांदेड – देगलूर शहराच्या न्यायइतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या नूतन न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत शिस्तबद्ध व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे यांच्या शुभहस्ते या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील ग. वेदपाठक हे होते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीरज पी. धोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सन 1920 पासून न्यायदानाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशस्त व सुसज्ज न्यायालयीन कक्ष, अभिवक्ता संघासाठी स्वतंत्र व सुसंस्कृत बार असोसिएशन तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त अशी ही बांधण्यात आलेली भव्य इमारत आता न्यायसेवेसाठी खुली करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रक दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) राघवेंद्र नरहरराव देव तसेच देगलूर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र नागनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उद्घाटन सोहळा नियोजित वेळेत व अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नांदेड येथील दिवाणी न्यायाधीश इंदूरकर यांनी केले. या कार्यक्रमास नांदेड, बिलोली, देगलूर येथील विधिज्ञ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, वकील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या नूतन न्यायालयीन इमारतीचे सामाजिक व न्यायालयीन महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.

न्यायालयीन इमारत ही केवळ भौतिक रचना नसून ती न्याय, संविधान आणि लोकशाही मूल्यांची सजीव प्रतिमा असते. देगलूरमध्ये उभी राहिलेली ही नूतन न्यायालयीन इमारत पुढील अनेक दशकांपर्यंत न्यायाच्या प्रकाशाचा दीपस्तंभ ठरेल, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!