नांदेड (प्रतिनिधी)-पोलिस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित इसमांकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेऊन त्याऐवजी बनावट पुडी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी ईश्वर सुलभाजी गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता आसरा नगरपाटी परिसरात दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगत तपासाच्या कारणावरून त्यांच्या हातातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर कागदात गुंडाळलेली पुडी त्यांच्या हातात देऊन आरोपींनी फसवणूक केली.
या घटनेनंतर लक्षात येताच फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी भाग्यनगर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६/२०२६ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार जावेद करीत आहेत.
