“अंधभक्तांचा उन्माद, पंतप्रधानांचा अभिनय आणि जगासमोर भारताची नाचक्की”
काल जगभरात ख्रिसमस साजरा झाला. आम्हीही आमच्या वाचकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या, कारण आम्ही त्या संस्कृतीतून आलो आहोत ज्या संस्कृतीने “वसुधैव कुटुंबकम्” हा मंत्र दिला. ज्यात संपूर्ण जग हे एक कुटुंब मानले जाते. हा केवळ घोषवाक्य नाही, तर माणुसकीची शिकवण आहे.
काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील चर्चमध्ये गेले. दोन्ही हात जोडून येशू ख्रिस्तासमोर उभे राहिले, प्रार्थना केली, कॅरोल सॉंग ऐकले. त्या सुरांवर पंतप्रधानांचे बोट हलताना दिसले. जणू काही त्यांना साक्षात नारायणच भेटले. असो, हा त्यांचा राजकीय अभिनय असेल. पण या अभिनयाच्या आड देशभर त्यांच्या अंधभक्तांनी घातलेला धुमाकूळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अब्रू काढतो आहे. इंग्लंडमधील The Telegraph सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने भारतातील ख्रिश्चन समुदायावर होणाऱ्या अन्यायावर सविस्तर बातम्या आणि विश्लेषण प्रसिद्ध केले आहेत. प्रश्न साधा आहे,आपण नेमके कोणत्या देशात जगतो आहोत? संविधान कुठे हरवले आहे?


फक्त 1.4 टक्के लोकसंख्या असलेल्या ख्रिश्चन समाजापासून एवढी भीती का वाटते?एकीकडे “हिंदू राष्ट्र” ओरडणारे अंधभक्त आणि दुसरीकडे चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्तासमोर हात जोडणारे पंतप्रधान हा दुहेरीपणा नाही तर काय?अमेरिकेतील पत्रकारांनी अडाणीपणावर प्रश्न विचारला की लगेच वसुधैव कुटुंबकम्चा जप सुरू होतो. मग ही कुटुंब भावना भारतात ख्रिश्चनांसाठी का संपते?
आज ख्रिश्चन सण मोडीत काढण्याचा प्रयत्न होतो आहे, पण हेच विसरले जाते की अमेरिकेचे राष्ट्रपती आणि इंग्लंडचे पंतप्रधान दिवाळी साजरी करतात. जगभर दिवाळी चालते, पण भारतात ख्रिसमस नको हा दुजाभाव नाही तर काय? हा थेट संविधानाच्या आत्म्यावर घाला नाही का?


28 जानेवारी 1999 रोजी ओडिशामध्ये ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्राहम स्टेन्स आणि त्यांचे दोन निरपराध मुलगे दहा वर्षांचा फिलिप आणि सहा वर्षांचा टिमोथी यांना जिवंत जाळण्यात आले. ते कुष्ठरुग्णांची सेवा करत होते. तेव्हा सत्तेत कोण होते, हे देश विसरलेला नाही. दोषींना शिक्षा झाली, पण आज पुन्हा तसाच द्वेष उफाळतो आहे.त्यानंतर सुद्धा स्टेन्सच्या पत्नी भारतात आपल्या सेवा देत राहिल्या. पुढे एका मुलाखतीत दारासिंह ला क्षमा करावी अशी विनंती भारत सरकारला सुद्धा केली. तुम्ही अश्या समुदायाला काय शिकवण देण्याची क्षमता ठेवता विचार करा.
मागील काही दिवसांत देशभर, विशेषतः उत्तर भारतात, ख्रिसमसविरोधी उन्माद उघडपणे दिसतो आहे. सजावट फेकून दिली जाते, साहित्य जाळले जाते, गरीब ख्रिश्चन साहित्य विक्रेत्यांना धमकावले जाते. एका अपंग ख्रिश्चन बालिकेला झटापट केली जाते आणि सरकार शांत आहे.
केरळमध्ये एका व्यक्तीला “बांगलादेशी” समजून मारले गेले, तिथे गुन्हा दाखल झाला, अटक झाली. पण ख्रिश्चनांविरोधातील हिंसाचारावर एकही FIR का नाही?
जो माणूस ख्रिश्चन धर्माविरुद्ध घाणेरडी भाषा वापरतो, तोच बांगलादेशातून आलेला असल्याचे सत्य तपासणीत समोर येते,मग हा घुसखोर नाही का? घुसखोर शोधायचे असतील तर इथेच आहेत. पंतप्रधान चर्चमध्ये गेले, तेव्हा फादरांनी देवाकडे प्रार्थना केली “यांना देश योग्य प्रकारे चालवण्याची शक्ती दे.”खरा प्रश्न असा आहे—हा देश अशा पद्धतीने चालवला जाऊ शकतो का?
1.4 टक्के लोकसंख्या असलेल्या समाजावर अन्याय करून, महिलांशी अपमानास्पद वागून, देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन करून हिंदू राष्ट्र उभे राहणार आहे का? आणि भारतीय संविधान त्याला परवानगी देते का?जर संविधान बदलायचेच असेल तर सरळ जाहीर करा. नोटबंदी जशी एका रात्रीत केली, तशीच घोषणा करा. “चारशे पार” का मागितले होते, हे देशाला माहीत आहे. प्रभूने 400 दिले नाहीत, नाहीतर संविधानच बदलले असते आणि त्यानंतर देश सावरण्याची कोणतीही तयारी तुमच्याकडे नव्हती.
पंतप्रधान म्हणतात “माझे ख्रिश्चनांशी जुने नाते आहे.”मग तुमच्या भक्तांना अचानक कोणती नवी उपज आली की “ख्रिश्चन धर्म इथे जन्मला नाही, म्हणून इथे चालणार नाही”? हा अधिकार त्यांना कोणत्या भारतीय कायद्याने दिला?
चर्चमधील फोटो-व्हिडिओ ख्रिश्चनांनी लपून काढले नाहीत ते तुम्हीच प्रसिद्ध केलेत. सर्वधर्मसमभाव दाखवण्यासाठी.पण करुणा कुठे आहे? देशभर अंधभक्तांनी जे घडवले, त्यावर एक शब्दही का नाही? खरे कारण स्पष्ट आहे,केरळ आणि तामिळनाडूच्या निवडणुका. आणि आंतरराष्ट्रीय बदनामीची भीती.चर्च मध्ये जाऊन पांघरूण घालून देश चालत नाही. देश चालतो संविधानाने कोणत्याही धर्म, विचारसरणी किंवा राजकीय सोयीने नाही.
