नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी गावात नामांकित, गडगंज श्रीमंतांची शाळा,पालकांची लुट करणारी शाळा किड्स किंगडम स्कुलने केलेल्या अनियमिततेसाठी खुलासा मागविला होता. शाळेने दिलेल्या खुलाशानंतर माधव सलगर यांनी या शाळेची मान्यता ाकाढून घ्यावी अशी शिफारस करणारे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांना पाठविले आहे.
नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने विविध अशा 17 मुद्यांवर किड्स किंगडम पब्लिक स्कुल या शाळेकडून खुलासा मागितला होता. शाळेने या संदर्भाने 17 डिसेंबर रोजी 17 मुद्यांवर आपले स्पष्टीकरण सादर केले. या सर्व मुद्यांसह शिक्षण विभागाने विचारलेले प्रश्न आणि शाळेने दिलेले उत्तर असे समोरासमोर जोडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकांना 23 डिसेंबर 2025 रोजी एक पत्र पाठविले आहे.
सरोजदेवी माहेश्र्वरी राजस्थानी मारवाडी मेमोरियल ट्रस्ट संचलित किड्स किंगडम पब्लिक स्कुल या शाळेची मुळ मान्यता शिवाजीनगर नांदेड अशी असतांना त्यांनी ती शाळा खुरगाव येथे नेली. शाळेच्या अभिलेखानुसार महाराष्ट्राच्या शासनाच्या एनओसीप्रमाणे सीबीएससी बोर्डाची इयत्ता 9 वी ते 10 साठी मान्यता आहे. सीबीएससीसाठी दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या एनओसीवर शाळेस खुरगाव येथे सीबीएससीचे वर्ग चालविण्याचा उल्लेख आहे. त्यानुसार ही शाळा सुरू असल्याचे दिसते.
संस्थेने शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर संस्थांचे अभ्यासक्रम, पुस्तके परवानगीशिवाय वापरता येत नाहीत. विद्यार्थ्यांना दप्तराचे बोजे शासनाच्या धोरणानुसार देता येत नाही. दि.13 डिसेंबर 2025 रोजी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शाळेला भेट दिली असता शाळा बंद होती. श्री चैतन्य टेक्नो स्कुलचे ओळखपत्र आणि रजिस्ट्रेशन शाळेला वापरता येत नाही. विद्यार्थी फिस प्रमाणात वाढ नाही. मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाची मान्यता नाही अशा शिफारशी लिहुन या शाळेची मान्यता काढून घेण्याची विनंती केली आहे.
शाळेने दिलेल्या उत्तरांमध्ये काही गमतीशिर बाबी आहेत. त्यात शाळेच्या इमारतीवरील फक्त एकच बोर्ड किड्स किंगडम पब्लिक स्कुलचा असून इमारतीच्या आत सर्वत्र भिंतीवर लावले बॅनर, बोर्ड, वर्ग खोल्यांच्या दारावरील पाट्या व इतर साहित्य श्री चैतन्य टेक्नो स्कुलच्या नावाचे आहेत. याचे उत्तर देतांना शाळेने लिहिले आहे की, शाळेच्या इमारतीत लावण्यात आलेले बोर्ड, बॅनर इत्यादी जाहीरात व प्रसिध्दीचा भाग म्हणून लावण्यात आलेले आहेत. किती विद्वतापुर्ण उत्तर आहे ना की, शाळेतच शाळेची जाहिरात सुरू आहे. सीबीएससीची मान्यता इयत्ता 9 वी आणि 10 वीसाठी आहे. त्या वर्गांसाठी ती एनओसी असेल पण ही सर्वच शाळा तेथे सुरू आहे.
एकंदरीत नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाने अत्यंत पारदर्शकपणे या शाळेबद्दलचा अहवाल तयार केला. त्यावर शाळेचा खुलासा मागितला. पण माध्यमिक शिक्षण विभागा खुलाशाने समाधान होत नाही म्हणून या शाळेची मान्यताच रद्द व्हावी अशी शिफारस शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे करतात. परंतू आता तेथे काय होईल, ज्याप्रमाणे सध्या भारताच्या सर्वसामान्य माणसाच्या आवाजाला काहीच जागा नाही तसेच होईल काय? आणि गडगंज श्रीमंतांचे ऐकून शिक्षण उपसंचालक फक्त श्रीमंतांचेच ऐकतील काय? या प्रश्नाचे उत्तर शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयानंतर लक्षात येईल.
संबंधीत बातमी…
नोटीस आली, उत्तर गायब! ‘किड्स किंग्डम–श्री चैतन्य’ प्रकरण तापले
