नांदेड- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. बालविवाहाचे समर्थन किंवा यासाठी सुविधा पुरविली गेली तरी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह सर्वांनी याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. कुठेही बालविवाह होणार नाही यासाठी सतत जनजागृती केली जाणार आहे. शाळा महाविद्यालयांमधूनही बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्याबाबत आदेशीत करण्यात आले होते.
यानुसार जवळ्याच्या मुलामुलींनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेऊन बालविवाह मुक्त करु संपूर्ण नांदेड जिल्हा असा नारा दिला.
समाजातील बालविवाहांचे उच्चाटन करण्यासाठी, भारत सरकारने बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ लागू केला आणि बालविवाह प्रतिबंध कायदा, १९२९ चे पूर्वीचे कायदे रद्द केले. हा कायदा बालविवाहांना प्रतिबंधित करण्यासाठी, संरक्षण आणि पीडितांना मदत करणाऱ्या किंवा पीडितांना मदत करणाऱ्या तरतुदींसह सशस्त्र आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे दिसते. यात सर्वच वयोगटातील लोक सहभागी होतात. त्यामुळे लहान मुलांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावेत आणि त्यांच्यात एक प्रकारची चीड निर्माण व्हावी यासाठी जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा देण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनी संपूर्ण नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत असे आवाहन करण्यात आले.
कशी घेतली बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा?
‘आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो कि, मुलगी असेल तर १८ वर्षाच्या आत व मुलगा असेल तर २१ वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ (१०९८) या क्रमांकावर संपर्क साधू. या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे.आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या गावात, आजूबाजूला, शहरात कोठेही बालविवाह नाही याची दक्षता घेऊ.’
