नांदेड- भारतात दरवर्षी २२ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी समर्पित आहे. या निमित्ताने जवळा देशमुख येथील विद्यार्थ्यांनी गणिती कूटप्रश्नांची निर्मिती करून रामानुजन यांना अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, मनिषा गच्चे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, इंदिरा पांचाळ, पांडुरंग गच्चे, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, संभाजी गवारे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयीची भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये गणितीय प्रश्नमंजुषा, कार्यशाळा, पोस्टर स्पर्धा आणि विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी ‘गणित कृती वर्ग’ देखील घेतले जातात. याचाच भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि गणित शिक्षक उमाकांत बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणिती कूटप्रश्नांची निर्मिती केली.
श्रीनिवास रामानुजन यांचे कार्य केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे, असे मुख्याध्यापक ढवळे यावेळी म्हणाले.
