“पोलीस खाते करील तेच होईल!” – जीवन घोगरे पाटील अपहरण-मारहाण प्रकरणात

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख तरी, आरोपी यादीत अनुपस्थिती –   

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायद्यापेक्षा ‘ओळखी’ मोठ्या ठरतात का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते जीवन आबाजीराव घोगरे पाटील यांचे अपहरण, दोन तास गाडीत फिरवून अमानुष मारहाण आणि त्यानंतर उपचार करून सुटका – हा प्रकार केवळ गुन्हा नसून पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर संशयाची छाया टाकणारा प्रकार ठरत आहे.

फिर्यादीनुसार, 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सिडको येथील बडोदा बँकेसमोरून जात असताना जीवन घोगरे पाटील यांच्या वाहनासमोर अचानक एक चारचाकी गाडी आडवी आली. त्यातून उतरलेल्या काही व्यक्तींनी चालकाच्या काचेवर दगड मारला. भीतीपोटी चालक पळून गेल्यानंतर, घोगरे पाटील यांना बळजबरीने गाडीत कोंबून डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. पुढील दोन तास त्यांना गाडीत फिरवून मारहाण करण्यात आली. त्यांचे डोके फोडले. डोळे बांधलेले असल्याने आपण कुठे गेलो, कोणाशी संपर्क झाला, याबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

या दरम्यान “साहेबांच्या नादी लागू नको” असे शब्द वारंवार ऐकू आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून हे प्रकरण केवळ किरकोळ नसून पूर्वनियोजित दबावतंत्र असल्याची शंका बळावते.

या घटनेप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी, आरोपी क्रमांकांची मांडणी आणि वापरलेली शब्दरचना अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. फिर्यादीत सात जणांची नावे आरोपी म्हणून नमूद आहेत –
शुभम सुनेवाड (वसरणी), राहुल दासरवाड  (मालेगाव, ता. वसमत), कौस्तुभ रणवीर (पूर्णा), मोहम्मद अफरोज (गिरगाव, ता. वसमत), देवानंद भोळे (नांदुसा, ता. नांदेड), माधव वाघमारे, विवेक सूर्यवंशी (गणेशनगर).

मात्र, याच फिर्यादीत पुढे एक वाक्य ठळकपणे नमूद आहे की “प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर व मोहन हंबर्डे यांनी वरील आरोपींना मारहाण करण्यास लावले.”
असे असताना थेट आरोप असूनही ही नावे आरोपी म्हणून का नाहीत? हा प्रश्न आत्तापासूनच चर्चेत आहे.

विशेष म्हणजे, या काही व्यक्तींविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या तत्सम प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाले, मात्र त्यावेळीही आमदार व त्यांच्या पुत्रांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे “आमचं काही होत नाही” या समजुतीतूनच असे प्रकार घडतात की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पोलीसांनी रात्री 9 वाजेपर्यंत बडोदा बँक परिसरातील व अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासून जलद हालचाली केल्याचे दाखवले असले, तरी फिर्यादीतील शब्दांची निवडच अनेक अर्थ सूचित करणारी आहे. संपूर्ण फिर्यादीत “जीवघेणा हल्ला” आणि कट हे  शब्दच टाळण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेची कलमे 118(1), 352, 351(2),351(3), 189, 191(2),191(3),140(3), 49 तसेच भारतीय शस्त्र कायद्याची कलमे 3 व 25 लावण्यात आली आहेत.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठववाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाचा शेवट जर संतोष वडवळे मारहाण प्रकरणासारखाच झाला, तर त्याचा अर्थ एकच ठरेल –
“पोलीस खाते करील तेच होईल” हे अलिखित, त्रिकालबाधित सत्य अजूनही बदललेले नाही.

आता प्रश्न एवढाच आहे की, या प्रकरणात खरोखर कायदा बोलणार की पुन्हा एकदा ‘नावे वगळून’ फाईल बंद केली जाणार?
जीवन घोगरे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी या तपासावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त  केले आहे.

संबंधित बातमी ….

सिडकोतून थेट अपहरण! राज्यस्तरीय नेत्याला भररस्त्यात मारहाण, कायदा कुणाच्या खिशात?  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!