नांदेड – साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मानवी जीवनाशी निगडित ज्वलंत लेखन करावे. आपल्या भूमिकेशी आणि निष्ठेशी प्रामाणिक रहावे. कोणत्याही पुरस्कारासाठी लेखन करू नये. तसेच पुरस्कारांच्या मागे न लागता ते आपोआप आपल्याकडे चालत आले पाहिजेत आणि त्यामुळे पुरस्काराचीच प्रतिष्ठा वाढली पाहिजे असे परखड मत येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. ते सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित सप्तरंगी सत्कार समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, गीतकार माधव जाधव, प्रा. प्रल्हाद हिंगोले, लेखिका रुपाली वागरे वैद्य, बालभारतीचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर हांडरगुळीकर, कवयित्री सावित्री शेवाळकर, गझलकार चंद्रकांत कदम, कवयित्री ज्योती करवंदे परांजपे, नम्रता खिल्लारे, सृष्टी पाईकराव, कवी डी. एन. मोरे, कवयित्री भाग्यश्री आसोरे, अंजली हिंगोले, नागोराव डोंगरे आदींची उपस्थिती होती.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने विविध पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा सन्मान करणारा समारंभ शहरातील हाॅटेल विसावा पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सन्मानार्थ कथाकथन, गझल मुशायरा आणि काव्यपौर्णिमा-१०२ या खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. पुढे बोलतांना ढवळे म्हणाले की, आजकाल साहित्यिकांचे नवनवे कळप निर्माण होत आहेत. ते होणे चांगले नाही, कारण त्यामुळे एकांगी विचारसरणी वाढते, निर्मितीची गुणवत्ता घटते आणि चिकित्सक वृत्ती कमी होते; त्याऐवजी, लेखकांनी स्वतंत्र विचार करून, वैविध्यपूर्ण साहित्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे आणि कोणत्याही गटात न अडकता समाजाच्या वास्तवाचे चित्रण करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून साहित्याला खरी दिशा मिळेल आणि ते समाजाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतील,असे ते म्हणाले.
दरम्यान, कंधार येथील कवी माधव जाधव लिखित शब्दनाद या कवितासंग्रहाचे आणि धम्मोदय वाघमारे लिखित प्रेमगंध या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न झाले. मान्यवरांच्या यथोचित सत्कारानंतर चंद्रकांत कदम, सावित्री शेवाळकर, रुपाली वागरे वैद्य, माधव जाधव, प्रा. प्रल्हाद हिंगोले, डॉ. ज्ञानेश्वर हांडरगुळीकर, अनुरत्न वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राहुल जोंधळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील कवी, कवयित्री, गझलकार आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
