नांदेड – नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेले कुष्ठ रुग्ण शोध अभियान (LCDC) अत्यंत यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान नियोजित क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे पूर्ण करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या समन्वयातून मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली.
अभियानातील महत्त्वाचे निष्कर्ष :
तपासणीचे प्रमाण :
१४ दिवसांच्या कालावधीत एकूण ५३,८६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली, जे लक्षित लोकसंख्येच्या ९६ टक्के इतके आहे.
संशयित रुग्णांची नोंद :
प्राथमिक लक्षणे किंवा कुटुंबातील संपर्क असलेल्या १,०६५ व्यक्तींची नोंद करण्यात आली. यापैकी ९९९ जणांची सखोल वैद्यकीय तपासणी आरोग्य पथकांकडून करण्यात आली.
नवीन निदान :
तपासणी दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ७ नवीन कुष्ठरुग्णांचे निदान करण्यात आले.
तात्काळ उपचार :
निदान झालेल्या सर्व रुग्णांवर त्वरित बहु-औषधी उपचार (MDT) सुरू करण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाचा ठोस पाठिंबा, आरोग्य विभागाचे सघन नियोजन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे हे अभियान उल्लेखनीयरीत्या यशस्वी झाले आहे. जिल्ह्यात कुष्ठरोगाचे लवकर निदान, व्यापक तपासणी आणि त्वरित उपचार सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.
