नांदेड (प्रतिनिधी)- “भारतात जातीयवाद संपला” असे म्हणणाऱ्यांनी नांदेडमधील मिलिंद नगर भागात 27 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सक्षम ताटे (२५) हत्याकांडाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणातील सहा आरोपींपैकी एक अल्पवयीन असून उर्वरित पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने यापूर्वी त्यांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज वाढीव पोलीस कोठडी मागणीवर सुनावणी घेतल्यानंतर दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. तावशीकर यांनी एका महिला आरोपीस वगळून इतर चार आरोपींना तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली.
खून कसा घडला?
27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सक्षम ताटेवर काही युवकांनी गोळ्या झाडल्या. जमिनीवर पडल्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली. या हत्येत अत्यंत भीषण रागातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने वार करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. पोलिसांनी दोन गावठी कट्टेही जप्त केले.
‘गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न, पण सत्य वेगळे’
घटनेनंतर सोशल मीडियावर “मरणारा युवक गुन्हेगार होता” असे दावे करण्यात आले. मात्र, प्राप्त माहितीनुसार सक्षम व आंचल गजानन मामीडवार यांचे प्रेमसंबंध होते. 27 नोव्हेंबर रोजी आंचलच्या बँक खात्यातून सक्षमच्या खात्यावर एक लाखाहून अधिक रक्कम ट्रान्सफर झाल्याची माहितीही समोर आली आहे. दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलीस स्टेशनमधील नाट्यमय घडामोडी
२७ नोव्हेंबर रोजी सकाळीच आंचल आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रार देण्यासाठी आंचल तयार नव्हती, मात्र तिच्या भावाने बहिणीला मारहाण केल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी धीरज कोमुलवार यांनी “घरातील भांडणे रोज आमच्याकडे आणू नका, एखाद्याला संपवून टाका, त्रास संपेल” असे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यानंतर सायंकाळी सक्षमची हत्या झाली.या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस धीरज कोमुलवार यांच्यावर कारवाईची मागणी होत असली तरी अद्याप कोणतीही शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नाही.
अल्पवयीन आरोपी सर्वाधिक धोकादायक?
आंचलच्या विधानानुसार, अल्पवयीन आरोपीला “तू काहीही गुन्हा केला तरी तुला मोठी शिक्षा होणार नाही” असे सांगून गुन्ह्याकडे प्रवृत्त केले गेले. हा अल्पवयीन आरोपी मोठ्यांपेक्षा अधिक आक्रमक असल्याचे आंचलने माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. सक्षमची आई व आंचल दोघींनाही पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोणकोण आरोपी कोठडीत?
न्यायालयाने पुढील आरोपींना तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली :
- जयश्री मदनसिंह ठाकूर उर्फ मामीडवार (वय 43) — महिला आरोपीला कोठडीतून वगळले
- गजानन बालाजीराव मामीडवार (वय 44)
- साहिल मदनसिंह ठाकूर उर्फ मामीडवार (वय 25)
- सोमेश सुभाष लखे (वय 20)
- वेदांत अशोक कुदळेकर (वय 18 वर्षे 7 महिने — अल्पवयीन आरोपी स्वतंत्र प्रक्रियेत)
सरकारी वकील अॅड. मोहम्मद अब्बास यांनी कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला.
जातीय विषाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सक्षम ताटे हा अनुसूचित जातीचा युवक होता. भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली असतानाही जातीविषयक विष किती खोलवर पसरले आहे हे या प्रकरणातून पुन्हा उघड झाले आहे. प्रेमसंबंध असूनही त्याकडे दुर्लक्ष करून, सक्षमला गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न आणि त्यातून निर्माण झालेला तणाव या सर्वांमुळे या हत्येच्या मूळ कारणांमध्ये जातीय विद्वेषाचे धागे स्पष्ट दिसत आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी सक्षम आणि आंचलचे वडील गजानन मामीडवार एकत्र असतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले असून सत्य काय आणि अफवा काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
संबंधित बातमी ….
