नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी पहेलवान टी हाऊसजवळ झालेला अनुसूचित जातीच्या युवकाचा खून हा ऑनर किलींग आहे. या प्रकरणात सहा जणांची नावे आरोपी या सदरात आहेत. त्यातील पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
काल सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास पहेलवान टी हाऊसजवळील मिलिंदनगर भागात सक्षम गौतम ताटे (25) रा.संघसेननगर नांदेड यास काही युवकांनी घेरले. त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि गोळी लागून तो खाली पडल्यावर त् याच्या डोक्यात अनेकदा दगडाच्या फरशीने वार करून त्याचे डोके चेंदा-मेंदा केले.
या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 360/2025 प्रमाणे कट रचुन खून करणे, ऍट्रॉसिटी कायदा आदी कलमे जोडलेली आहेत. या प्रकरणात आलेल्या तक्रारीनुसार सक्षम ताटेचे प्रेम संबंध मामीडवार कुटूंबातील मुलीसोबत होते आणि काही दिवसानंतर ते पळून जाऊन लग्न करणार होते. ही माहिती कळाल्यानंतर मामीडवार कुटूंबियांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह सक्षम ताटेला कायमचे समाप्त करून टाकले.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात गजानन बालाजी मामीडवार, त्यांची दोन मुले हेमश आणि साहिल, सोमेश सुभाष लके या चार जणांसह पाच जणांना पोलीसांनी अटक केली आहे. वेदांत अशोक कुंडेवकर या नावाचा युवक फरार आहे. गम्मत अशी आहे की, गजानन मामीडवारने सुध्दा अंतर जातीय विवाह केलेला आहे. पण त्यांची मुलगी अंतरजातीय विवाह करण्याच्या तयारीत असतांना तिच्या होणाऱ्या भावी नवऱ्याला समाप्त करून गजानन बालाजी मामीडवार यांना काय मिळाले हा प्रश्न उपस्थित होत आहे. मामीडवार कुटूंबियांवर यापुर्वी सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत.
संबंधीत बातमी…
मिलिंद नगरमध्ये 25 वर्षीय युवकाचा खून; गोळी मारली की दगडाने ठेचून ठार केले? तपास सुरू
