नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात बोटीने गस्त घालत काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव आणि गंगाभेट या परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा कारवायांचा पर्दाफाश केला. या मोहिमेत एकूण ₹37 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून काही साहित्य शासन नियमांनुसार नष्ट करण्यात आले आहे.
पोलिस अंमलदार शंकर माळगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज सकाळी नऊ वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक नदीपात्रात कारवाईसाठी रवाना झाले. या पथकात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, तसेच पोलीस अंमलदार मुंडे, श्याम भोसले, शेख, शंकर माळगे, सिरमलवार, चावरे, शेख जमीर, शेख आसिफ, धम्मपाल कांबळे आणि लव्हारे यांचा समावेश होता.

पथकाने कल्लाळ परिसरातून बोटीतून आवश्यक साहित्यांसह प्रवास सुरू करून विविध ठिकाणी धाड टाकली. तेथे अवैध वाळू उपसा होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला :
- 10 ब्रास वाळू – किंमत ₹50,000
- 54 तराफे – किंमत ₹27,00,000
- 3 इंजिन – किंमत ₹9,00,000
- 12 लोखंडी ड्रम – किंमत ₹12,000
- 15 प्लास्टिक ड्रम – किंमत ₹9,000
- 17 लोखंडी पाईप – किंमत ₹51,000
एकूण मूल्य : ₹37,22,000
शासन नियमावलीप्रमाणे काही मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला असून उर्वरित साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी मालक संतोष हंबर्डे (रा. विष्णुपुरी), तसेच बिहार राज्यातील संजीवन बिन हारून बिन आणि वकील मिश्री साहनी आणि इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा क्र. 1135/2025 नोंदवण्यात आला आहे.या कारवाईबद्दल इतवारा उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांनी नांदेड ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले आहे.
