हे काम करू शकतात ते फक्त कर्दनकाळ पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप!
नांदेड (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हा शाखेने पाच भंगार चोरांना पकडून त्यांची नावे व फोटोसह प्रेसनोट प्रसारमाध्यमांना पाठवली. धक्कादायक म्हणजे, त्या प्रेसनोटमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकाचे संपूर्ण नावही लिहिले आहे. इतरांच्या चुकांवर नोटीसांचा धडाका लावणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेलाच आता याबाबत नोटीस मिळायला नको का? कारण बालकायद्यानुसार विधीसंघर्षग्रस्त बालकाचे नाव कधीही जाहीर करता येत नाही. मग प्रश्न उरतो—या अधिकाऱ्यांना नोटीस कोण देणार? आणि या परिस्थितीत एकच नाव डोळ्यासमोर येते—शहाजी उमाप.

आज स्थानिक गुन्हा शाखेची प्रेसनोट सर्व वर्तमानपत्रांना पाठवण्यात आली. अशा प्रेसनोटच्या शेवटी कायमप्रमाणे “जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड” असेच लिहिलेले असते, म्हणजे अधिकृतरित्या ही नोट जनसंपर्क शाखामार्फतच पाठवली जाते. पण प्रत्यक्षात या नोटांची मसुदा-तयारी स्थानिक गुन्हा शाखेच्या कक्ष क्रमांक ११ मध्ये होते आणि तीच नोट पुढे जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. हे सर्वांना माहिती असलेलं सत्य आहे.
आज दिलेल्या प्रेसनोटमध्ये पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार मिलिंद नरबाग, प्रमोद जोंधळे, इमरान शेख, संदीप घोगरे, बालाजी कदम, अमोल घेवारे, संतोष बेल्लुरोड, महेश बडगु आणि सायबर सेलचे राजू सिटीकर आणि दिपक ओढणे या सर्व लोकांनी पाच भंगार चोरट्यांना पकडले. त्यामुळे शिवाजीनगर, मुदखेड आणि हदगावमधील दोन असे चार गुन्हे उघडकीस आले. ज्यामध्ये ८५ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
चोरट्यांची नावे पुढीलप्रमाणे दिली आहेत:
– इरन्ना गंगाधर नकलवाड (२८)
– मारोती प्रकाश जिंकलवाड (३०)
– अशोक शिवराम वाघमारे (२७)
– १७ वर्षे ८ महिन्यांच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचे संपूर्ण नाव (बेकायदेशीररीत्या) पण आम्ही कसे लिहिणार त्या बालकाचे नाव कारण आम्हाला तर कायदा कळतो ना !
– शंकर मसु जिंकलवाड (२८)
यासोबत फोटोही प्रसारित करण्यात आला असून त्यात फक्त चारच आरोपी दिसतात. म्हणजे बालकाला फोटोमध्ये आणलेले नाही, पण नाव मात्र ‘धडाक्यात’ जाहीर केले! ही तर थेट कायद्याची पायमल्लीच आहे.स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ अधिकारी उदय खंडेराय यांना या गंभीर चुकीची जाणीव कशी झाली नाही? इतरांची छोटीशी चूक झाली तरी नोटीस देण्यासाठी धावपळ करणारे हेच अधिकारी, स्वतःच्या हातून कायद्याचं उल्लंघन झाल्यावर मात्र “चुकीने झालं” या गोष्टीचा आधार घेणार का?प्रसारमाध्यमांनी बातमी लिहिली तर काही तासांत नोटीस देण्याची एवढी घाई करणाऱ्या या शाखेला स्वतःच्या बेकायदेशीर कृत्यासाठी नोटीस मिळायला नको का?
बालकायदा क्रूर अपराधी असला तरीही बालकाचे नाव प्रकाशित करण्यास स्पष्ट मनाई करतो—ही गोष्ट या अधिकाऱ्यांना माहिती नसावी, यावर कोण विश्वास ठेवेल?आणि आता खरा प्रश्न—या अधिकाऱ्यांना नोटीस कोण देणार?या जिल्ह्यात हे धाडस करू शकतील ते फक्त एकच व्यक्ती कर्दनकाळ पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप!
