राज्य नाट्य स्पर्धेतील “अस्वस्थ वल्ली” नाटकाने पु.लं देशपांडे च्या आठवणी केल्या जाग्या

सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्य नाट्य स्पर्धेत वाढतोय प्रेक्षकांचा उत्साह
नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2025 – 2026 च्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर झपूर्झा फाऊंडेशन, परभणी च्या वतीने विनोद डावरे प्रमोद लिखित आणि दिग्दर्शित ‘अस्वस्थ वल्ली ‘ हे नाटक सादर करण्यात आले. शंकरराव चव्हाण नाट्यगृह नांदेड येथे झालेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
पु. ल. देशपांडे अर्थात भाई। यांच्या 106 व्या वाढदिवसानिमित्य त्यांनी निर्माण केलेली 7 पात्रे ही आपल्या निर्मात्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट स्वर्गात जातात. भाईंना आपलीच मुलें स्वर्गात आल्याचे एकीकडे दुःख तर खूप वर्षानंतर भेट होत असल्याचा आनंद ही होतो. भाईंची ही मुले भाईंच्या सहवासातला काळ आणि आजचा काळ या वर काय भाष्य करतात.विशेष म्हणजे, फुलराणी ही देखील त्याच वेळी पुलं ना भेटायला स्वर्गात जाते.  कल्पनेला वास्तवाचे भान ठेवून या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. स्वर्गात आलेल्या एकूण पात्रांपैकी नारायण आणि फुलराणी या दोन पात्रांची प्रत्यक्ष भेट झाल्याचे पुलंनी कुठे लिहिलेले नाही म्हणून, ते 2 वगळता बाकी पात्रे जेव्हा प्रवेश करतात तेव्हा भाई प्रत्येकाची ओळख करून देतात. स्वर्ग, इंद्रदेव, यमराज, सुनीताबाई आणि भाईंची कुटी तिथे या सर्वांची भेट आणि संवाद या काल्पनिक नाट्य संहितीचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
या नाटकातील पु.ल देशपांडे यांची भूमिका महेश जोशी यांनी केली तर सुनिताबाई यांची भुमिका अनुजा पालेकर यांनी केली, नारायण (संकेत गाडेकर), अंतुबरवा (सुभाष जोशी), फुलराणी (ऐश्वर्या डावरे), चितळे मास्तर (महेश रोडे), नाथा कामत (पृथ्वीराज देशमुख), सखाराम गटणे (स्वस्तिक काजे), जामु परिट (पांडूरंग शास्त्री), पेस्तन काका  (अमित सरदेशपांडे), इंद्रदेव (कार्तिक खरे), यमराज (वैभव काकडे) , नारदमुनी (सचिन वांगे) यांनी केले.
त्याचप्रमाणे नाटकाला स्वप्नवत करण्यासाठी प्रकाश योजना ही बालाजी दामुके तर नेपथ्य संकेत गाडेकर ,श्रीकांत जगदंबे यांनी केले. वेशभूषा  यश वाकळे व वैशाली जोशी तर रंगभूषा ललिता जोशी यांनी केली. नाटकाला अजून रंगत आणण्यासाठी लाइव्ह संगीताचा प्रयोग करण्यात आला असून मयंक परळीकर व गणेश राजघुरे त्याला उत्तम साथ दिली. रंगमंच व्यवस्था यादव लोखंडे व मोहन पांचाळ सांभाळून नाटक यशस्वी पणे सादर केले.
आज सायंकाळी ७ वा. तन्मय ग्रुप, नांदेड द्वारा निर्मित, नाथा चितळे लिखित व दिग्दर्शित ‘अंधारयात्रा’ हे नाटक सादर होणार आहे. नाममात्र रु. १५ व रु. १० मध्ये तिकीट दर असलेली ही राज्य नाट्य स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालायाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!