महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत रसिकांचा वाढता प्रतिसाद
नांदेड – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२५–२६ च्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर गुरुवारी, (ता. २०) ‘संपूर्ण’ हे नाटक सादर करण्यात आले. शंकरराव चव्हाण नाट्यगृह, नादेड येथे सायंकाळी सात वाजता झालेल्या या प्रयोगाची प्रेक्षकांनी उत्सुकतेने दखल घेतली. नटराज प्रसन्नच्या पारंपरिक मंगलमय उद्घोषानंतर सादरीकरणाला सुरुवात झाली.

राजीव गांधी युवा फोरम, परभणी या संस्थेने या स्पर्धेसाठी ‘संपूर्ण’ हे नाटक सादर केले असून, या नाटकाचे लेखन विजय करभाजन यांनी केले आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शनाची जबाबदारीही विजय करभाजन यांनी सांभाळली असून, नाटकाचे निर्माता संजय पांडे आहेत. संस्थेचे पथक नाट्यस्पर्धेत सातत्याने सहभाग नोंदवत असून, या वर्षीही स्पर्धेतील सहभागामुळे रसिक नाट्यप्रेमींमध्ये उत्सुकता होती. ‘संपूर्ण’ या नाटकाची कथा तत्त्वज्ञानिक आणि रहस्यमय अंगाने उलगडणारी आहे. कथेत व्यक्ती आणि त्याच्या साहित्यामधील नात्याचा विचार मांडताना, लेखकाच्या निर्मितीतील पात्रच जर स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, आपल्या भावनांबद्दल किंवा अन्यायाबद्दल लेखकालाच प्रश्न विचारू लागले तर निर्माण होणाऱ्या तणावाचे मांडले गेले आहे. विवाह समुपदेशक असलेल्या अविनाश जगताप उर्फ निरुपम याच्याकडे एक स्त्री (प्रतिमा) येते आणि ‘मला संपूर्ण करा’ असा आग्रह धरत, त्याच्याशी आपली जुन्या परिचयाची गूढ भाषा बोलत राहते, पण अविनाश तिची ओळख नाकारतो. या कथाभागाभोवती नाटकाची रचना पुढे सरकते. यातील गूढतेचा ताण, पात्रांमधील संभ्रम आणि संवादाचे टोकदार स्वरूप प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवणारे आहे. नाटकाच्या सादरीकरणात रंगमंचीय मांडणी, संवादांची लय आणि कथानकातील गती या तिन्ही गोष्टींनी नाट्यगृहातील वातावरण रंगतदार बनवले. लेखक व दिग्दर्शक म्हणून विजय करभाजन यांनी हाताळलेली शैली नाटकात जाणवली. निर्माते संजय पांडे यांच्या प्रयत्नांमुळे नाट्यमंचनासाठी आवश्यक बाबींमध्ये सुबकता आणि एकसंधता दिसून आली. संस्थेच्या कलावंतांनी केलेले संवादातील भाव, हालचालींची अचूकता आणि पात्रांमधील नातेसंबंधांचे चित्रण यामुळे संपूर्ण नाट्यप्रयोग प्रभावी ठरला तो निरुपम ( किशोर पुराणिक) आणि प्रतिमा (डॉ. अर्चना चिक्षे) यांच्या अभिनयाने. नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरीत सादर करण्यात आलेल्या ‘संपूर्ण’ या नाटकाने उपस्थित रसिकांवर ठसा उमटवला असून, स्पर्धेतील पुढील टप्प्याकडे प्रेक्षक आणि स्पर्धक संस्थांचे लक्ष लागले आहे.ही राज्य नाट्य स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
