भारतात तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींची असंख्य उदाहरणे आपण रोजच पाहतो. अशाच समस्यांवर प्रकाश टाकत आशा नावाच्या तृतीयपंथीय व्यक्तीने अनिकेत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधताना आपले हृदयद्रावक मनोगत व्यक्त केले.
आशा म्हणाल्या की, “तृतीयपंथीयांचा जन्म हा निसर्गाची देण आहे; पण समाज त्यांच्याकडे पाहतो त्या दृष्टिकोनावर त्यांचे आयुष्य ठरते.” समाजातील पूर्वग्रह आणि स्वीकाराचा अभाव यामुळे तृतीयपंथीयांना अनेकदा उपेक्षा सहन करावी लागते. त्यांच्या अंगी असलेले अनेक कलागुण, क्षमता आणि व्यक्तिमत्त्व समाज लक्षातच घेत नाही. परिणामी अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. कारण अनेकदा शाळाच त्यांना प्रवेश देत नाहीत. शिक्षण नसल्यामुळे रोजगाराच्या संधी तर दूरच; आणि यामुळे त्यांच्या उपजीविकेसाठी भिक्षावृत्ती हाच एकमेव पर्याय उरतो.आशा पुढे सांगतात, “आमचे तारुण्य भिक्षा मागण्यातच जाते; पण सर्वात मोठा प्रश्न आमच्या वृद्धापकाळाचा आहे.” तृतीयपंथीयांना विवाह-संततीचा आधार नसतो. वय वाढल्यावर नवीन पिढीतील तृतीयपंथीय त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे अनेकांना अतिशय कष्टप्रद आणि असुरक्षित जीवन जगावे लागते.
जरी समाजात काही प्रमाणात सकारात्मक बदल झाले असले तरी अनेक ठिकाणी परिस्थिती आजही तितकीच कठीण आहे. त्यामुळेच तृतीयपंथीयांच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आयुष्याकरिता शासनाने स्वतंत्र तृतीयपंथीय वृद्धाश्रम स्थापन करणे अत्यावश्यक असल्याची कळकळीची विनंती आशांनी केली.तृतीयपंथीयांच्या वृद्धापकाळाच्या प्रश्नावर शासन व समाजाने संवेदनशीलतेने विचार करून पावले उचलावीत, अशी आशांची अपेक्षा आहे