नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एका हायवा गाडीमधून अवैध वाळू पकडली आहे. गाडीची किंमत 40 लाख रुपये आणि वाळूची किंमत 25 हजार रुपये असल्यामुळे एकूण 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
14 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे दोन वाजता, पोलिस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गस्त घालत होते. गस्ती दरम्यान वाजेगाव-गोंडार वळण रस्त्यावर पोलिसांनी हायवा गाडी (क्रमांक 26 AD 1021) ची तपासणी केली. यावेळी गाडीत अवैध वाळू भरलेली आढळली. गाडीची तपासणी केल्यानंतर वाळूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी सचिन जनार्दन हटकर, सोपान उर्फ लक्ष्मण राजू पुयड, पप्पू पाटील, संदीप संभाजी पुयड या चार जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक 1080/2025 दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रार पोलीस अंमलदार फारुख मदारसाब शेख यांनी दिली. या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार भोसले, यालावार, मारवाडे, फारुख शेख यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
