या स्फोटात बारा लोकांचा मृत्यू झाला असून, पन्नासहून अधिक जखमी झाले आहेत. दिल्लीमध्ये हा ब्लास्ट घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर होते. अधिकृतरीत्या सांगण्यात आले की ते भूतानच्या राजांच्या वाढदिवसासाठी गेले आहेत, परंतु प्रत्यक्षात तेथे व्यावसायिक चर्चेसाठी गेले होते. त्यांनी भूतानला ऊर्जा क्षेत्रासाठी चार हजार कोटी रुपयांची “क्रेडिट लाईन” देण्याचे आश्वासन दिले आहे. ही क्रेडिट लाईन म्हणजे भूतानला आवश्यक साहित्य भारतातूनच खरेदी करण्याची आर्थिक हमी. त्यामुळे हा दौरा अधिक व्यावसायिक स्वरूपाचा होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.या संपूर्ण घटनाक्रमाची सुरुवात ८ नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या छाप्यांपासून झाली. हे छापे जणू प्रसिद्धीसाठीच टाकले जात होते, कारण कॅमेऱ्यासमोर सुरक्षा रक्षक आपली पोझिशन दाखवत होते. हे छापे १० नोव्हेंबरपर्यंत सुरू होते. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला. १० नोव्हेंबर रोजीच २९०० किलो बॉम्बनिर्मितीचे रसायन जप्त करण्यात आले होते. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की सात तारखेपासून झालेल्या छाप्यांच्या प्रसिद्धीमुळे अतिरेक्यांनी घाईघाईत हा स्फोट घडवून आणला.

या प्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी बरेच जण डॉक्टर आहेत. त्यामुळे या घटनेला “व्हाईट कॉलर टेररिझम” असे संबोधले जात आहे. श्रीनगरमध्ये २२ ऑक्टोबर रोजी ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचे पोस्टर लावण्यात आले होते, ज्यामध्ये भारतीय सुरक्षा संस्थांना धमकी देण्यात आली होती. हे पहिले पोस्टर १९ ऑक्टोबरला दिसले होते. तपासादरम्यान सोफिया येथून मोहम्मद इरफान याला अटक झाली. त्याच्या चौकशीतून डॉ. उमर आणि डॉ. मुजमील अहमद यांच्या नावांवर प्रकाश पडला. नंतर फरीदाबाद येथे तपास करताना पोलिसांना मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडली, सुमारे ३००० किलो.
या प्रकरणात असिस्टंट प्राध्यापक डॉ. उमर आणि डॉ. शाहीर शहीद यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. शाहीर या ‘जमात-उल-मोमिनात’ नावाच्या महिला अतिरेकी संघटनेच्या संचालिका होत्या, जी पाकिस्तानस्थित संघटना ‘हाफीज सईद ’च्या बहीणीने स्थापन केली होती. गेली दोन वर्षे या संघटनेद्वारे अमोनियम नायट्रेट जमा करण्याचे काम सुरू होते.
जेव्हा अतिरेक्यांच्या अटकेबाबत बातम्या सुरू झाल्या, तेव्हा डॉ. उमर फरीदाबादहून दिल्लीकडे कारने रवाना झाला. त्याने सर्व कागदपत्रे व्यवस्थित केली होती. वाहन सीएनजीवर चालणारे असल्याने प्रदूषण प्रमाणपत्रही घेतले होते. सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी त्याने लाल किल्ल्याजवळ हा स्फोट घडवून आणला.
या घटनेमुळे भारतातील काश्मिरी विद्यार्थ्यांवर आणि नोकरदारांवर शंका घेतली जात आहे, जे अत्यंत धोकादायक आहे. पाकिस्तानने आपली नीती बदलली आहे. आता तेथून थेट लोक न पाठवता भारतातीलच काही काश्मिरी युवकांना पैसा देऊन अशा कृतींसाठी वापरले जात आहे. त्यामुळे भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारतीय सुरक्षा यंत्रणा, जम्मू-काश्मीर पोलीस, हरियाणा पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस यांनी अतिशय कौशल्याने हा कट उधळून लावला. त्यांचे कौतुक करावे लागेल, कारण वेळेत कारवाई झाली नसती तर आणखी मोठा अपघात झाला असता.हा हल्ला ‘फिदायीन’ प्रकारचा नव्हता, कारण हल्लेखोर स्वतःचा जीव घेण्यासाठी तयार नव्हता. स्फोटात आयईडीचा वापर नव्हता, त्यामुळे जमिनीवर मोठे नुकसान झाले नाही.
भारताचे नागरिक म्हणून आपण सर्वांनी या घटनेतून शिकायला हवे, एखाद्या प्रदेशातील किंवा धर्मातील सर्व लोकांना दोष देणे चुकीचे आहे. अतिरेकी विचारसरणी असलेली माणसे वेगळी असतात; त्यांची विचारसरणी हिंसक असते आणि त्यांच्याशीच लढा दिला पाहिजे, संपूर्ण समाजाशी नव्हे.

