नवीन नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथे दि. ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाकुंभ इनोव्हेशन समिट’ या राष्ट्रीय स्पर्धेत विद्यापीठाची विद्यार्थिनी भूमिका राठोड हिने आपल्या ‘सर्वायकल कॅन्सर किट’ या नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पासाठी सांत्वन पारितोषिक प्राप्त केले.
या स्पर्धेत भूमिकाला रु. १०,०००/- नगदी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महिलांमधील सर्वायकल कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही किट ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या उपयोगी संकल्पना असल्याचे परीक्षकांनी नमूद केले.महाकुंभ इनोव्हेशन स्पर्धेत विद्यापीठातील एकूण १५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला, ज्यामध्ये खुशीकौर कुमार, गायत्री देशमुख, तेजबिंदरकर परिहार, ऐश्वर्या येडे, गीता कुऱ्हे, पूजा खानजोडे, स्वप्नजा नरोटे, अश्विनी चंपाफुले, श्रुती घुगे, श्रुती गलाडे, भूमिका राठोड, वैष्णवी बनकर, पठाण सदरा, पायल राठोड व वसुंधरा कुटे यांचा समावेश होता.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डि. डी. पवार, नवोक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, आयक्युएसीचे संचालक डॉ. सुरेंद्र रेड्डी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील व जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा देत अभिनंदन केले.या यशासाठी मार्गदर्शक डॉ. सुनील हजारे, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोलीचे प्राचार्य डॉ. एन. एस. सोळंके, व डॉ. कोल्हे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. चैतन्य यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठात नवोन्मेष, स्टार्टअप आणि संशोधन संस्कृतीला चालना देण्यासाठी उचललेली पावले या यशातून फलद्रूप होत असल्याचे नमूद केले. भूमिका राठोड व डॉ. सुनील हजारे यांनी केवळ स्वतःचा आणि विद्यापीठाचा सन्मान वाढविला नाही, तर महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी उपयुक्त अशा नवतंत्रज्ञानाच्या सामाजिक गरजेची जाणीव अधोरेखित केली, असे त्यांनी सांगितले.
