भ्रष्टाचाराचा भंडाफोड! पत्नी, आई आणि मुलासकट चौघांवर गुन्हा नोंद–लोहा हादरले!

नांदेड (प्रतिनिधी)-भ्रष्टाचाराचा काळा अध्याय पुन्हा एकदा उघडकीस! लोहा पंचायत समितीतील कनिष्ठ लेखा अधिकारी मधुकर बालाजी मोरे (वय 50) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत आणखी एक गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर प्रकरणात मोरे यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा तब्बल ₹50,14,729 इतकी अधिक मालमत्ता आढळून आली आहे. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नाच्या तब्बल 53.42% इतकी ‘अपसंपत्ती’ असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.ही मालमत्ता दिनांक 1 एप्रिल 2008 ते 10 जुलै 2020 या कालावधीत जमा झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणात मोरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔹 आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

मधुकर बालाजी मोरे (वय 50) – कनिष्ठ लेखा अधिकारी, पंचायत समिती लोहा

सौ. आशा मधुकर मोरे (वय 45) – पत्नी

कौशल्याबाई बालाजीराव मोरे (वय 75) – आई

अतुल मधुकर मोरे – मुलगा, वैद्यकीय दुकान मालक

हे सर्व सोनखेड (ता. लोहा) येथील रहिवासी असून, प्रकरणातील गुन्हा वजीराबाद पोलिस ठाण्यात क्रमांक 440/2025 असा 28 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदविला गेला आहे.यापूर्वी 2020 साली देखील मधुकर मोरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तो प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, त्या चौकशीत मोरे यांनी अज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादित केल्याचे उघड झाले होते. त्यावरूनच पुढील उघड चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत त्यांच्या संपत्तीचा विसंगत ताळेबंद समोर आला.या नव्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक राहुल तरकसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

“लोकसेवकाने पारदर्शकतेचा आदर्श घालावा अशी अपेक्षा असते; पण भ्रष्टाचाराच्या सावलीतून प्रशासनाची प्रतिष्ठा कलंकित होत आहे,” असे स्थानिकांनी व्यक्त केले.लोहा पंचायत समितीच्या गलियार्‍यात या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पुढील तपासाचे चक्र वेगाने फिरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!