स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार : दिवाळी सांजने नांदेड उजळला” 

गोदावरी किनाऱ्यावरील सांस्कृतिक सूरमंचावर ‘दिवाळी पहाट’चा अद्भुत संगम

नांदेड- गोदावरीच्या तीरावरच्या मंद वाऱ्यात, सूर आणि तालाच्या लहरींनी नांदेडकरांच्या मनात दिवाळीचा नवा उजेड फुलवला. जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट – स्वरसरीता व डॉ सान्वी जेठवाणी निर्मित सांज झंकार’ या सांस्कृतिक पर्वाने नांदेडच्या परंपरेला नव्या तेजाने उजाळा दिला. हा तेराव्या वर्षीचा सोहळा जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे.

यंदा त्यात नव्या कलात्मक प्रयोगांची फुलबाग फुलली आहे.

स्वर, ताल आणि गझलेचा अभिनव संगम

 

कवी बापू दासरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या फ्युजन ऑफ तालवाद्य आणि गझल या अनोख्या प्रयोगाने संगीतप्रेमींना एक अद्वितीय अनुभव दिला.

कार्यक्रमाची सुरुवात बासरीवादक ऐनोद्दीन आणि त्यांच्या शिष्य परिवाराच्या सामूहिक बासरीवादनाने झाली. त्यानंतर सार्क परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. गुंजन शिरभाते यांनी राग देश मधील मनोहारी करामती पेश केल्या. त्यांना तबल्यावर भार्गव देशमुख यांनी सुंदर साथ दिली.

 

यानंतर राग यमनमध्ये मिलिंद तुळणकर यांनी जलतरंगावर बंदिश सादर करत श्रोत्यांना थक्क केले. त्याच रागातील गझल ‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आही’ ही बाळासाहेब पाटील यांच्या सुमधुर आवाजात रंगली. त्यांच्या साथीला प्रकाश सोनकांबळे (तबला), चिन्मय स्वामी (सिंथ), ऐनोद्दीन (बासरी) आणि अनहद वारसी (गिटार) यांनी स्वरांची जादू विणली.

राग आणि गझल यांचा असा एकाच मंचावरचा ताळमेळ हे या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले. राग चंद्रकंसमध्ये ऐनोद्दीन यांच्या बासरीनंतर सौ. आसावरी रवंदे जोशी यांनी बापू दासरींची ‘कवितेच्या गावा मधल्या शब्दांची गाणी व्हावी’ ही गझल सादर केली. पुढे राग झिंजोटीत सतारवादक कल्याणी देशपांडे आणि राग चारुकेशीमध्ये जलतरंगवादक मिलिंद तुळणकर यांच्या सादरीकरणांनी कार्यक्रमात स्वरवैविध्य निर्माण केले.

 

शेवटी राग बिहागमधील कल्याणी देशपांडे यांच्या सुरांनी सभागृहात माधुर्य भरले, तर त्याच रागातील ‘सलोनासा सजन है और मैं हूँ’ ही गझल आसावरी जोशी यांच्या आवाजात भावविव्हल करून गेली. सूत्रसंचालन व शेरोशायरीच्या झंकाराने बापू दासरी यांनी संपूर्ण सादरीकरणाची मनमोहक गुंफण केली.

 

‘नृत्य झंकार’ने उजळली सांज

 

संध्याकाळी ‘लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य झंकारने दिवाळीच्या रंगतिला भरघोस सौंदर्य दिले. पहल राठी आणि आराध्या पोईल यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. त्यानंतर मंगळागौर, श्रीराम स्तुती, महालक्ष्मी अष्टकम या नृत्यरचना – कथ्थक व भरतनाट्यमच्या सुंदर संगमातून – प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेल्या.

 

नृत्यदिग्दर्शक शुभम बिरकुरे आणि ईशा राजीव जैन यांच्या ‘महाकाली अवतार’ व ‘रक्तबीज पतन’ या नृत्यनाट्यांनी प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला. कार्यक्रमाचा शेवट पारंपरिक गोंधळ या नृत्याने झाला. संपूर्ण सादरीकरणात नृत्य, प्रकाशयोजना आणि संगीत संयोजन यांचा सुंदर ताळमेळ अनुभवायला मिळाला.

 

‘स्वरसरीता’चा पहाटेचा जादुई प्रवास

 

प्रात:साडेपाच वाजता गोदावरीकाठावर ‘स्वरसरीता’ कार्यक्रमाला संगीतशिरोमणी अंकिता जोशी (मुंबई) यांच्या रागदारी गायनाने सुरुवात झाली.

राग ललितच्या ‘रतना रे नैना’ या झपताल निबद्ध बंदिशीने प्रेक्षकांना घराणेशाही गायकीचा साक्षात्कार घडवला. त्रितालातील बाल समय रवी भक्षी या ध्रुत बंदिशीत त्यांच्या गमक, घसीट आणि मिंडयुक्त गायकीने स्वरांची आभा निर्माण केली. भक्तिगीते, शबद आणि दिलकी तफीश या लोकप्रिय गीतांनी प्रात:काळी वातावरण सुरेल केले.

 

अंकिता जोशी यांना हार्मोनियमवर अभिनय रवंदे, तबल्यावर प्रशांत गाजरे, पखवाजवर विश्वेश्वर जोशी यांनी साथ दिली. त्यांच्या शिष्यवृत्तीतल्या अदिती रवंदे, ईश्वरी जोशी, भाग्यश्री टोमके यांसह बासरीवर अनहद वारसी, सिंथवर चिन्मय मठपती आणि टाळावर धनंजय कंधारकर यांनी स्वरसंवाद साधला.

कार्यक्रमाचे संगीत संयोजन आणि निवेदन लक्ष्मीकांत रवंदे यांनी केले.

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम उपस्थित होते.

मान्यवर कलाकारांचा सत्कार संयोजन समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.

गोदावरीचा बंदाघाट, शेकडो रसिकांची गर्दी आणि सुरांनी नटलेले वातावरण — अशी ही दिवाळीची सांज, जिथे स्वरांनी फुलझड्या उडवल्या आणि नृत्याने आकाश उजळले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!