नांदेड(प्रतिनिधी)-हिमालयातील बर्फाच्छादित हॉट स्प्रिंग या १६ हजार फूट उंचीवरील रणभूमीवर, २१ ऑक्टोबर १९५९ रोजी इतिहासातील एक शौर्यगाथा कोरली गेली. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे शूर जवान आणि चीनी सैन्य यांच्यात झालेल्या अचानक चकमकीत भारताच्या दहा जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. त्या अमर शौर्याच्या स्मृतीसाठी हा दिवस दरवर्षी “पोलिस हुतात्मा दिन” म्हणून देशभरात साजरा केला जातो.

मागील वर्षभरामध्ये, देशभरातील १९१ पोलिस अधिकारी व अमलदारांनी आपले कर्तव्य बजावत असताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या शौर्याला आज संपूर्ण पोलिस दलाकडून सन्मानाने अभिवादन करण्यात आले.
विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव, पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्यंजने, डॉ. अश्विनी जगताप तसेच राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी हुतात्म्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
तुर्यनादासारख्या सलामीत शौर्याची गाथा दुमदुमली, डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तर हृदयात वीरत्वाचा गजर घुमत होता. देशसेवेचा शपथविधी आणि शौर्याची शपथ घेत, सर्व अधिकारी व जवानांनी “कर्तव्य हेच धर्म, आणि बलिदान हीच शान” असा संदेश दिला.
हुतात्म्यांना वास्तव न्यूज लाईव्हच्या वतीने कोटी कोटी अभिवादन… जय हिंद!
