नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी झालेल्या जबरी चोरी, घरफोडी आणि मंदिरातील चोरीच्या घटनांमुळे एकूण ₹,11,74,900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रामतीर्थ येथे एटीएम फोडून रोख रक्कम चोरी
नरसी ते देगलूर मार्गावर रामतीर्थ येथे अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून गॅस कटरने मशीन फोडली. यामधून ₹4,80,900 ची रोख रक्कम चोरून नेण्यात आली. याशिवाय एटीएम मशीनचे ₹78,000 चे नुकसानही झाले आहे.या प्रकरणी एटीएम अधिकारी कैलास चांदू कांबळे यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 313/2025 नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नरवाडे अधिक तपास करत आहेत.
शिवनगरमध्ये घरफोडी : पाच लाखांहून अधिक रक्कम लंपास
नांदेड शहरातील शिवनगर, अंडा गल्ली, नुरी चौक येथे शेख वाजिद शेख बाबा मिया यांच्या घरात 19 ते 20 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घराचे कपाट फोडून ₹2,00,000 रोख आणि सोन्याचे दागिने ₹3,77,000 किंमतीचे असा एकूण ₹5,77,000 किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 429/2025 नोंदविण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जोंधळे करत आहेत.
डेअरी चौकात जबरी चोरी – व्यक्तीवर हल्ला करून २३ हजारांची लूट
डेअरी चौक ते लातूर फाटा दरम्यान 19 ऑक्टोबर रोजी रात्री 20:45 वाजता शैक्षणिक अहमद पाशा यांना जुन्या वादातून अडवून मोहम्मद सोहेल अहमद अब्दुल समद आणि सैफुल ला अमोल अब्दुल समाज तसेच अब्दुल स्वामी मोमीन समद अब्दुल्लाह अब्दुल समद या चार जणांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील ₹15,000 रोख आणि ₹8,000 किमतीचा मोबाईल असा एकूण ₹23,000 ऐवज चोरून नेला.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 1007/2025 दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.
मंदिरातील चोरी : सोन्याचे दागिने आणि दानपेटी लंपास
वझर (ता. देगलूर) येथे भवानी मंदिरात 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. त्यांनी ₹94,000 किमतीचे सोन्याचे देवाचे दागिने आणि दानपेटी चोरून नेली.या प्रकरणी अंबादास मारुती खरात यांच्या तक्रारीवरून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 224/2025 दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार पाटील यांच्या कडे आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू
या सर्व घटनांची चौकशी संबंधित पोलीस ठाण्यांचे पथक करीत असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांना सीसीटीव्ही बसविणे, घर सुरक्षित ठेवणे आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
