‘ज्ञानतीर्थ-२०२५’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव – जलसा

 

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ’ २०२५ युवक महोत्सवामध्ये आज दि.१४ ऑक्टोबर रोजी क्रांतिवीर बिरसा मुंडा कला मंचावर जलसा या आंबेडकरी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यामधून अनेक महाविद्यालयाने सहभाग घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने कंधार येथील शिवाजी महाविद्यालय, नांदेड येथील यशवंत महाविद्यालय, लातूर येथील दयानंद महाविद्यालय यासह इतरही अनेक महाविद्यालयाने यामध्ये सहभाग नोंदवला.

क्रांतिवीर बिरसा मुंडा कला मंचावर पारंपरिक “जलसा” या लोककला प्रकाराचे अप्रतिम दर्शन घडले. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जोशपूर्ण आणि कलात्मक सादरीकरणाने प्रेक्षकांची दाद मिळवली. दयानंद फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जलसाचे बोल होते — “सिंहापरी जन्मला या भुवरी, देऊनिया ललकारी ललकारी…” मुख्य जलसा गायक आनंद रामदासे, साहगायक अनिकेत शितोळे, दिशा राठोड, वैष्णवी जगदाळे, श्रीलक्ष्मी पाटनूरकर, आदिती महाजन आणि अनिकेत रामदासे होते. वाद्यविभागात हार्मोनियमवर विश्वजीत पांचाळ, ढोलकीवर धम्मदिप सपकाळ आणि झांजवर आदित्य गोडे यांनी जलसाला सुरेल वादनाची रंगत दिली. तर श्री शिवाजी महाविद्यालय, कंधारच्या विद्यार्थ्यांनी “गावामध्ये गाव आहे मधु गाव, तिथे जन्मले भिमराव सखी बाई गं… माय त्यांची माता, भिमराव झाला त्याचा पिता, झाला गरीबांचा नेता सखी बाई गं…” या प्रेरणादायी गीताने सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. या जलसात हार्मोनियमवर अमोल वानखेडे आणि विश्वा कदम, ढोलकीवर डिगांबर वंजे तसेच झांजवर नामदेव रुंजे यांनी वादन केले.

महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जलसांमधून परंपरा, शौर्य, समाजजागृती आणि सांस्कृतिक एकात्मतेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. प्रेक्षकांनी या उत्स्फूर्त सादरीकरणाला भरभरून दाद देत कलाकारांना उभे राहून टाळ्यांचा वर्षाव केला.

उद्या दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता युवक महोत्सवाचा समारोप होणार आहे. याप्रसंगी स्पर्धेमधून प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता विद्यार्थी संघाला पारितोषिकाची वितरण करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण प्रसंगी समारोपाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाची कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती मध्ये नांदेडचे पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, छत्रपती संभाजीनगर येथील तंत्रशिक्षणाची सहसंचालक डॉ. किरण लाडाने, सोलापूर येथील सकाळ पेपरचे संपादक सिद्धाराम पाटील, मुंबई येथील सनरायझर्स प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे संचालक निळकंठ चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ज्ञानतीर्थ २०२५ युवक महोत्सवामध्ये साहित्यिक प्राध्यापक भास्कर चंदनशिवे विचार मंच क्रमांक चारवर वाद-विवाद स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रोजगाराभिमुख आहे का हे धोरण अनुकूल आहे किंवा अनुकूल नाही अशा दोन्हीही बाजूने उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांनी वादविवाद केला आहे यामध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!