सुषमाताई नक्की पापी कोण?आदरणीय सी जे आय गवई की.?

 

सी जे आय गवई यांच्यावर बूट फेकल्यावर मीडिया, स्थानिक वकील, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे पुरोगामी यापैकी कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आले नाहीत याबद्दल सुषमाताईं अंधारे यांनी खंत व्यक्त केली. त्या मुद्याशी मी सहमत आहे. परंतु या सर्व प्रकाराबद्दल “तुम्ही पापी आहात तुम्ही ऋषी नाहीत….”अशा प्रकारचे विधान त्यांनी केले. राज्यघटनेचा अभ्यास, भाषण कौशल्य, सामान्य बद्दल तळमळ, निडरपणा,…., अशा गुणवत्तेबद्दल मला व्यक्तिशः सुषमा ताई बद्दल आदर आहे. त्यांना राजकीय भविष्य देखील उज्वल दिसते. तरीपण त्यांनी पाप पुण्याची कल्पना मांडली हे आश्चर्यकारक वाटते. पाप-पुण्य ही ब्राह्मणी धर्मातील संकल्पना. कर्मफल सिद्धांत यावर आधारित आहे. आदरणीय सीजीआय या घटनेतील ’बळी victim’ यांच्यावर हल्ला झाला. याला कारण त्यांनी पूर्व जन्मामध्ये पाप केले होते. म्हणून त्याचे फळ त्यांना या जन्मात मिळाले असे आमच्या ब्राह्मणी हिंदू धर्मातील कर्मफल सिद्धांत सांगतो. या घटनेतील बळीचा धर्म पुनर्जन्म मानत नाही त्यामुळे कर्मफल सिद्धांत त्यांना लागू होत नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख बनले हे देखील त्यांच्या पूर्व जन्माचे फळ नाही. त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे पण ते त्यांच्या एकट्याचे यश नाही.ते आहे इथल्या राज्यघटनेमुळे. असंख्य स्वातंत्र्यवीरांमूळे . ज्यांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

राज्यघटना निर्माण करण्यासाठी बाबासाहेब यासह अनेक तज्ञांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यावर ही राज्यघटना आधारित आहे. चार्वाक पासून असंख्य महामानवांनी याचा पाया घातला. साडे 97% भारतीयांनी या घटनेवर विश्वास ठेवला. त्यामुळे आदरणीय गवई हे cji बनले. वरील घटकांच्या त्यागाचे, श्रमाचे काय? सुषमाताई म्हणतात त्याप्रमाणे आदरणीय गवई पापी असते तर ते या पदावर जाऊ शकले असते का? मुळीच नाही!

आदरणीय गवई यांची या घटनेत कायदा माहित असलेले नागरिक म्हणून जबाबदारी नाही का? प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. आत्म संरक्षणाचा अधिकार असतो तो त्यांनी पाळला का? ते ज्या खुर्चीवर बसतात ती न्याय क्षेत्रातील व लोकशाहीतील सर्वोच्च खुर्ची आहे, ती घटनात्मक आहे. तिचे पावित्र्य राखण्याच काम कोण करणार? ते आदरणीय गवई यांनीच केले पाहिजे. त्यांनी ते का केले नाही याबद्दल सुषमाताईंनी विचारना करायला हवी होती.

काही वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना गळ्यात मडके बांधून व कमरेला झाडू बांधून गाव कुसा बाहेर राहावे लागत होते हे आदरणीय गवइना माहीत होते व आजही काही मोजक्या लोकांची परिस्थिती सुधारली पण अजून फार मोठा जनसमुदाय त्याच पातळीवर पण बदललेल्या स्वरूपात राहत आहे याची त्यांना माहिती असावी. मग ते सर्व पापी न ठरता सी जे आय बनलेले आदरणीय गवई यांना त्या पापी म्हणून त्यांच्या निष्क्रियता व डरपोकपणाचे समर्थन का करतात हे समजत नाही. नाहीतरी सध्या राज्यघटना नावाची गोष्ट प्रभावी राहिली नाही. आदरणीय गवई यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बूट फेकणारी ती व्यक्ती तसेच त्या व्यक्तीमागे असलेली ’समान हेतू common intention’ ’कट करणे conspiracy’ ….., करत असलेली RSS ही संघटना , मनुस्मृतीचे समर्थन करत स्वतःला आर्य ब्राह्मण म्हणविणारे . त्यांच्या संघटना. समाज.राजकीय नेते यांची नावे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद द्यायला हवी होती. त्यातून एक मोठा घटनात्मक पेच देशासमोर उभा राहिला असता आणि त्यातून खऱ्या राज्यघटनेचा व लोकशाहीचा पुनर्जन्म होऊ शकला असता. त्या क्रांतीचे नेते बनण्याची संधी आदरणीय गवई यांना होती. अजूनही संधी गेलेली नाही.

“कितीही अज्ञानी असला तरी राजाने ब्राह्मणालाच मुख्य न्यायाधीश बनविले पाहिजे….” अशा आशयाचा श्लोक मनुस्मृति मध्ये आहे. बूट फेकणारा तिवारी हा एक निमित्त मात्र प्यादे आहे.

एरवी कोणतेही चीफ जस्टिस हे एक

नोकरशहा असतात. त्यांचा स्वतःचा अजेंडा असतो. कम्फर्ट झोन मधून बाहेर जाण्याचे धाडस करीत नाहीत.त्याच्या दृष्टीने बहुजन, मूलनिवासी यांचा झगडा, महामानवांचे प्रयत्न, राज्यघटना, लोकशाही, समाजहित, या गोष्टी दुय्यम असतात.

बाबासाहेबांनी सांगितले की हिंदू धर्म मधील वर्ण व्यवस्था ही एक बंद मजल्यासारखी इमारत आहे. त्यात मजले बदलता येत नाहीत.

पण आम्हा नोकरशहांनी महामानवांना खोटे ठरविले. आमच्यासारखे शूद्र वर्गातून वरिष्ठ सनदी अधिकारी बनलो तर आम्ही शूद्र रहात नाही. वरच्या मजल्यावरील ब्राह्मणासारखे बनतो. आमचे ब्राह्मणायझेशन/ संस्कृतायझेशन होते. पाप काय आणि पुण्य काय हे ठरवण्याचा अधिकार शेवटी याच ब्राह्मणांना प्राप्त होतो!

भिवंडीत राहणाऱ्या तुळशी नावाच्या आदिवासी मांगीरा जातीच्या महिलेचा सतरा वर्षाचा मुलगा 1984 दंगलीत तिच्या डोळ्यासमोर तोडला आणि जाळला होता. हे का घडलं असावं असं मी तिला विचारल असता तिनं एकाच वाक्यात उत्तर दिलं “काय सांगू साहेब कर्म माझं!”

मोलमजुरी करणाऱ्या चांदबीचा नवरा व बहिणीचा नवरा यांना जमावाने घासलेट ओतून पेटवून दिले होते. त्यावर ” ये तो अल्ला की मर्जी थी!” असे उत्तर चांदबिने दिले होते .हे तुळशीचे पूर्वजन्मीचे पाप नव्हते की चांदबीच्या अल्लाची वाईट नजर नव्हती. इथली प्रशासकीय व्यवस्था कालबाह्य आहे असे समजून आम्ही भिवंडी मध्ये मोहल्ला कमिटी हा प्रयोग राबवला होता.1992 दंगली मुंबई दोनदा जळाली पण भिवंडी शांत राहिली.त्यानंतर दंगलींना आळा घालण्याचे एक नवे मॉडेल निर्माण झाले.

बूट फेकीची घटना ही बळीच्या जाती व कुटुंबा पूरती मर्यादित नसून या देशात चालू असलेल्या मालक जमात म्हणून घेणारे परकीय आर्य ब्राह्मण व इथले मूळ निवासी बहुजन यांच्यामधील झगड्याचा परिपाक आहे. त्या दृष्टीने सुषमाताई आपण सगळेजण मिळून विचार करू या.

–सुरेश खोपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!