नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीला अनुसरून राज्य शासनाच्या सर्वसामान्य विभागाच्यावतीने सर्व आयएएस, सर्व आयपीएस, भारतीय वनसेवेतील सर्व अधिकारी यांच्यासह राज्य शासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यात जमा करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकावर उपसचिव सुदाम आंधळे यांची स्वाक्षरी आहे.
राज्यातील सर्वच वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी तसेच केंद्र सरकारचे अधिकारी, राज्यातील सर्व कर्मचारी यांनी ऑक्टोबर महिन्यातील मिळणाऱ्या वेतनापैकी एक दिवसाचे वेतन पुर आणि अतिवृष्टी मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी खाते क्रमांक 10972433751 एसबीआय बॅंक मुख्य शाखा फोर्ट येथे जमा करण्यास सांगितले आहे. सर्व विभाग प्रमुखांना हे वेतन जमा करण्यासाठी प्रत्येकाकडून अनुमती लिहुन घेण्यास सांगितले आहे. असा आदेश असेल तर कोणता अधिकारी आणि कोणता कर्मचारी त्यासाठी नाही म्हणणार आहे. परंतू या एक दिवसाच्या वेतनातून एक मोठा निधी अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या मदतीसाठी तयार होईल हे मात्र नक्की. हे शासन परिपत्रक राज्य शासनाने राज्याच्या संकेतस्थळावर संकेतांक 20250081802221007 प्रमाणे प्रसिध्द केला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन कापले जाणार
