सत्संगाने प्रेरित होवून भक्ती मार्गक्रमणा करणे म्हणजेच उपासना-युगलशरणजी महाराज

नांदेड,(प्रतिनिधी)-संतांच्या संगतीत राहून त्यांच्या विचारांशी आपले विचार जोडून भक्ती मार्गावर चालत राहणे हीच खरी उपासना आहे, असे प्रतिपादन गोडीया वैष्णवाचार्य युगलशरणजी महाराज यांनी आज येथे केले.

सत्यनारायण नंदकिशोर बजाज आणि बजाज कुटुंबाच्या वतीने येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या भागवत ज्ञानयज्ञाचे तिसरे पुष्प गुंफतांना युगलशरणजी महाराज बोलत होते. आजचा विषय नृसिंह चरित्र हा होता.

महाराजांनी आपल्या निरुपणाची सुरुवात गोविंद के गुण गाईये, गोपाल के गुण गाईये या मधूर गीताने केला. महाराजांच्या सुमधूर आवाजाने आणि गीतातील प्रभावी शब्दांनी वातावरण भक्तीमय केले.

त्यानंतर युगलशरणजी महाराज यांनी ज्योत से ज्योत जगाते चलो हे गीत निरुपणासाठी घेतले. ते म्हणाले की, आपल्याला इतरांविषयी प्रेम असेल तर भक्ती मार्गावरुन जाणे सुलभ होते. तसेच परमेश्वराविषयीचे प्रेम मनात असणे आणि इतरांमध्ये ईश्वर पाहून ईश्वराचे नामस्मरण करणे हेच आपले अध्यात्मिक कर्तव्य आहे.

संतांविषयी बोलतांना युगलशरणजी महाराज म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक समाजात एक संत झाला आहे. या संतांनी आपल्याला व्यापक दृष्टी दिली आणि उपासना कशी करायची याचे उदाहरण घालून दिले.

जेंव्हा अध्यात्मिक ज्ञानाचा उजेड आपल्या अंतःकरणात पडतो तेंव्हा अज्ञानरुपी अंधार नष्ट होतो, सर्वत्र प्रकाशमान होते आणि संसारातील मोह, माया आपोआप दूर होते.

संत हे देवाचे अवतार आहेत, असे सांगून महाराज म्हणाले की, संत केवळ जीवन उपभोगण्यासाठी जगात आले नाहीत, तर मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म झाला असेही युगलशरणजी महाराज यांनी सांगितले. संत आपल्या कार्यापासून कधीही ढळत नाहीत आणि आपल्या विचारांपासून कधीही दूर जात नाहीत, याचे स्पष्टीकरण करताना युगलशरणजी महाराज यांनी एक संत आणि विंचू यांची कथा खुलवून सांगितली. संतांची महती सांगताना युगलशरणजी महाराज म्हणाले की, कावळ्यालाही हंस बनविण्याची किमया संत करु शकतात.

‘इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले’ या गीताचा उल्लेख करुन युगलशरणजी महाराज म्हणाले की, आपले प्राण जातांना आपल्या समोर ईश्वर असावा, त्याने आपल्याला दर्शन द्यावे, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते, परंतू प्राण जाताना ईश्वराचे स्मरण होणे हे सोपे नाही, त्यासाठी आयुष्यभर भक्ती मार्ग अवलंबावा लागतो.

क्षणचित्रे

युगलशरणजी महाराज यांनी आपल्या मधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलेच, परंतू विठ्ठला रे विठ्ठला कधी येशील माझ्या घरा या गाण्याने तर भाविक स्त्री-पुरुष समोरच्या मोकळ्या जागेत येवून सगळ्यांनी ताल धरला.

व्यासपीठाच्या समोर असलेला पिंजरा आणि त्यातील पोपट भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!